आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नसणार आहे. ऑक्टोबर महिन्यातील १७ तारखेला घटस्थापनेने शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरुवात होणार आहे. इतिहासात प्रथमच भाविकाशिवाय हा नवरात्र महोत्सव होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्र महोत्सव आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नवरात्र महोत्सवात अलंकार पूजा, सिमोल्लंघन, घटस्थापना वेगवेगळ्या विधीपुर्वी प्रमाणे होणार असुन या वेळी सेवेकरी, पाळीकर पुजारी, उपाध्ये पुजारी प्रत्येकी ५ जणांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. या वेळी मंदिरात जाणाऱ्या पुजारी यांची रँपिड अँटीजेन टेस्ट घेतली जाणार आहे. तर तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेच्या वेळी २५ भोपे पुजारी यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. अहमदनगर येथील पलंग पालखीचे मानकरी यांच्या मोजक्या लोकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.

नवरात्र महोत्सवकाळात बाहेरील भाविक तुळजा भवानीच्या दर्शनाला तुळजापुर शहरात येऊ नये म्हणून शहरापासुन ५ किलो मिटर अंतरावर बँरेगेटींग केली जाणार आहे. नवरात्र महोत्सव काळात भाविकांनी दर्शनाला येवु नये म्हणुन पुजारी यांनी भाविकांना कळवावे, असे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पुजारी यांना केले आहे. या वेळी शहरातील पाळीकर पुजारी, भोपे पुजारी, उपाध्ये पुजारी, सेवेकरी, पुजारी नागरिक हजर होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like