‘कोरोना’मुळे कार्तिकी यात्रा गावोगावी साजरी करण्याचे जिल्हा प्रशासनाने केले आवाहन

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या अनुषंगाने कार्तिकी यात्रा गावोगावी साजरी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्याचसोबत पंढरपूर शहर व परिसरातील ११ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरात बाहेरून कोणी येऊ नये म्हणून चार बाजूंनी नाकाबंदी केली आहे. यासाठी पंढरपूर शहरात अठराशे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी स्वतःची काळजी घेण्याबरोबर जनतेचे संरक्षण करण्याची सूचना अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिल्या.

२५ ते २७ नोव्हेंबर विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन बंद

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने आषाढी यात्रेपाठोपाठ कार्तिकी यात्राही प्रतिकात्मक आणि मर्यदित स्वरूपात करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने घेतला. त्याच पार्श्वभूमीवर पंढरपुरात २४ नोव्हेंबर रात्री १२ वाजल्यापासून ते २६ नोव्हेंबरपर्यंत (४८ तास) संचारबंदी लागू करण्यात आली आहे. म्हणून २५ ते २७ नोव्हेंबर या काळात विठ्ठल-रुक्मिणी मातेचे सध्या सुरू केलेले मुखदर्शन बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला.

कार्तिकी एकादशीला अजित पवार पंढरपुरात

कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात येणार आहे. मात्र, वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन घेता येत नसेल, तर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी पूजाही रद्द करावी, असा नाराजीचा सूर उमटू लागला. तेव्हाच पुण्यात बोलताना अजित पवार यांनी कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरला जाणार असल्याचे स्पष्ट केलं.

असा असेल पोलीस बंदोबस्त

>> पोलीस अधीक्षक – १
>> अतिरिक्त पोलीस अधीक्षक – १
>> पोलीस निरीक्षक/ सहायक पोलीस निरीक्षक – १३०
>> उपविभागीय पोलीस अधिकारी अधिकारी – ११
>> पोलीस कर्मचारी – ११००
>> वाहतूक पोलीस – १००
>> एसआरपी – १
>> दंगाकाबू पथक – १
>> होमगार्ड – ५००