Nashik News : यंदा शिवजयंती मिवरणुकीत नवीन मंडळांना ‘नो-एन्ट्री’ – भुजबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अद्यापही संपलेला नाही. त्यामुळे कोरोनासंदर्भात शासन नियमांचे पालन करत शिवजन्मोत्सव साजरा करावा. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मिरवणुकीत नवीन मंडळास सहभागी होता येणार नाही, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

येत्या 19 फेब्रुवारीला साजरा होणा-या शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीस परवानगी मिळावी या मागणीचे निवेदन शहरातील मंडळानी भुजबळ यांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या उपस्थितीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, छत्रपती सेनेचे चेतन शेलार, नीलेश शेलार, पंचवटी शिवजन्मोत्सव समिती, नवीन नाशिक शिवजन्मोत्सव समिती आदीसह शहरातील विविध शिवजन्मोत्वस समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नवीन मंडळांना परवानगी मिळणार नाही. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे मंडळांना बंधनकारक राहणार आहे. मिरवणुका वेळेत काढून वेळेत संपविण्यात याव्यात. मिरवणुकीत जास्त गर्दी होणार नाही, याची काळजी सर्व मंडळांनी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.