भीमा कोरेगाव दंगली बाबत ‘त्यांच्या’ विरुद्ध अद्याप पुरावे नाहीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यामध्ये झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात माओवाद्यांचा हात आणि पैसा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. माओवादी म्हणून काम करणारे सुधीर ढवळे यांच्यासह पाच जणांना पुणे पोलिसांनी बुधवारी अटक करुन पुण्यात आणले. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे माओवाद्यांशी संबंध असल्याचे पुरावे असले तरी भीमा कोरेगाव दंगलीबाबत अद्याप कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी सांगितले. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या कागदपत्रात भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या काही नेत्यांचा उल्लेख आढळून आला आहे.

पुण्यात शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर रोजी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी माओवाद्यांच्या पैशांचा वापर करण्यात आला होता. तसेच माओवाद्यांचा यामध्ये हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. बंदी असलेल्या सीपीआय (माओस्ट) या दहशतवादी संघटनेसोबत अटक करण्यात आलेल्या पाच जणांचे संबंध होते. तसे दस्ताऐवज पोलिसांना प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर एल्गार परिषदेत माओवाद्यांचा संबंध असला तरी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीशी त्यांचा काही संबंध होता की नाही, याविषयी अजून पुरावे मिळाले नसल्याचे ही सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी सांगितले.

एल्गार परिषदेला माओवादीयाचा पैसा वापरण्यात आला : सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम

पुण्यामध्ये एल्गार परिषद आयोजित करणा-या आयोजकांवर पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी नागपूर, मुंबई आणि दिल्ली येथे एकाचवेळी छापे टाकून पाच जणांना अटक केली. सुधीर ढवळे अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत आणि रोना विल्सन यांना अटक करुन पुण्यात आणण्यात आले.

पुणे पोलिसांनी अटक केलेल्या रोना विल्सन आणि अॅड. सुरेंद्र गडलिंग हे माओवादी चळवळीशी संबंधित असून चळवळीसाठी पूर्णवेळ काम करत आहेत. या दोघांकडे मिळालेल्या कॉम्प्युटरच्या हार्ड डिक्सची फॉरेंसिंक लॅबमध्ये क्लोन कॉपी करण्यात आली, त्यावेळी सीपीआय (माओस्ट) या दहशतवादी संघटनेशी घनिष्ठ संबंध असल्याची कागपत्रे पोलिसांना सापडली. तसेच याचे धागेदोरे सुधीर ढवळे यांच्यापर्य़ंत आहेत. तर रोना विल्सन याच्याकडे माओवाद्यांची मुळ कागदपत्रे सापडली असून त्याचा तपास करण्याचे काम सुरु आहे.

माओवादी फरार नेता मिलिद तेलतुंबडे याचे रोनाला पत्र

रोना विल्सन याच्या कॉम्प्युटरमध्ये सापडलेल्या कागदपत्रात माओवादी फरार नेता मिलिंद तेलतुंबडे याने रोना विल्सन याला लिहिलेले एक पत्र मिळाले आहे. यामध्ये भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या काही नेत्यांचा उल्लेख असून त्यांची मदत झाल्याचे त्यात म्हटले आहे. हे पत्र जानेवारीमधील असून कोरेगाव भीमाची दंगल झाल्यानंतरचे आहे. यात तथ्य किती आहे, याचा तपास करण्यात येणार आहे.

एल्गार परिषदेपूर्वी भूमिगत कार्यकर्ते सुधीर ढवळे यांच्या संपर्कात

पुण्यामध्ये घेण्यात आलेल्या एल्गार परिषदेपूर्वी अनेक भूमिगत कार्यकर्ते सुधीर ढवळे याच्या संपर्कात होते. एल्गार परिषदेच्या दोन महिने आगोदर कॉम्रेड मगलु आणि दिपू हे सुधीर ढवळे याच्या संपर्कात होते. तसे पोलिसांना मिळालेल्या कागदपत्रावरुन आढळून आले आहे.
अटक करण्यात आलेल्या शोमा सेन या माओवादी संघटेच्या संपर्कात असल्याचे पुरावे मिळाले असून त्यांनी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेला ही हजेरी लावली होती.

पुणे शहरात यापूर्वी देखील नक्षलवादी कारवाया करणा-यांवर कारवाई करण्यात आली होती. परंतु पोलिसांकडे सबळ पुरावे नसल्याने त्यांची न्यायालयातून सुटका झाली होती. परंतु या प्रकरणात पोलिसांनी सबळ पुरावे जमा केले आहेत.

पुणे पोलिसांनी अटक केलेल्या सुधीर ढवळे, प्राध्यापिका शोमा सेन, महेश राऊत आणि रोना विल्सन यांना न्यायालयाने 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या वतीने अॅड. तौफीक शेख, कुमार काळे, बी.ए. एलोर, शाहीद अक्तर यांनी काम पाहिले.