‘डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून ‘त्या’ वक्तव्याची अपेक्षा नव्हती’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप सरकारच्या काळात त्रास झाला, असे वक्तव्य डाॅ. तात्याराव लहाने यांनी केले. त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती. लहाने यांनी चार भिंतींच्या आत बोलायला पाहिजे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लहाने यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा यासाठी पुढाकार घेतला होता, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.

दरेकर सोमवारी पिंपरी- चिंचवडच्या दौ-यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरेकर म्हणाले, डाॅ. तात्याराव लहाने यांनी भाजप सरकार मध्ये आपल्याला फार त्रास झाला अशी प्रतिक्रिया दिली होती. परंतू, अशाप्रकारचे वक्तव्य त्यांच्यासारख्या व्यक्तीने करणे योग्य नाही. राजकारणात सत्ताधारी किंवा विरोधक जाहीररित्या एकमेकांची उणीदुणी काढतात. त्याप्रमाणे प्रशासनातील, सरकारमधील उणीदुणी बाहेर काढणे शोभा देणारे नाही.

शिवसेनेच्या करणी आणि कथणीत फरक आहे. संभाजीनगरच्या बाबतीत आम्ही काही तडजोड करणार नाही, असे सांगतात. मग महापालिकेत त्यांची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी महापालिकेत ठराव करावा कॅबिनेटचा निर्णय घ्या, केंद्र सरकारच्या मदतीची आवश्यकता लागल्यास आम्ही पुढाकार घेऊ. संभाजीनगर, असे नामकरणाची कृती करून दाखवावी, असे म्हणून दरेकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.