एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही : कृषी मंत्री दादासाहेब भुसे

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हयातील शेतकऱ्यांना बँकानी पीक कर्ज वितरीत करण्यासाठी उदिष्ट ठरवून देण्यात आले होते. मात्र बँकानी उदिष्टाच्या केवळ 31 टक्के कर्ज वितरीत केले आहे. तर 69 टक्के शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलेले नाही; त्यामूळे सर्वच शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे यासाठी अग्रणी बँकेच्या जिल्हा व्यवस्थापकांनी नियोजन करून कोणत्याही परिस्थितीत पुढील 15 दिवसात पीक कर्ज वाटप करावे, असे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादासाहेब भुसे यांनी दिले आहेत. तसेच एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचीत राहणार नाही, असेही सांगितले.

कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादासाहेब भुसे हे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी आढावा बैठक घेतली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे,प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बजरंग मंगरूळकर, कृषी विकास अधिकारी डॉ.टी.जे.चिमण शेटे यांच्यासह जिल्हा अग्रणी बँकेचे विजयकर आदि उपस्थित होते.

जिल्हयातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बी-बियाणे, खत किती उपलब्ध करून दिले आहेत. बँकांनी शेतकऱ्यांना उदिष्टाप्रमाणे पीक कर्ज वाटप केले आहे का किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला व किती शेतकरी अजून कर्जमाफी पासून वंचित आहेत याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. तसेच सोयाबीन पेरलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात बीयाणे न उगवल्याचे तक्रारी किती आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्याचा पंचनामा करावा तर ज्या बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यास चाल ढकल केली आहे अशा सर्व बँकांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेवून पीक कर्जाचे वाटप वाढविण्यासाठी गाव व बँक निहाय आराखडा तयार करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

विशेष म्हणजे प्रत्येक बँकांनी दररोज शेतकऱ्यांना किती कर्जाचे वाटप केले याचा आढावा घ्यावा. हे वर्ष कृषी उत्पादकता वर्ष असून आपला जिल्हा या उत्पादकेत राज्य व देशपातळीवर कुठे आहे. हे डोळयासमोर ठेवून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे असे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी दिले. तसेच पेरणीचे दिवस असून शेतकऱ्यांना चढया दराने कृत्रिम टंचाई भासवून बीयाणे व खत विक्रीचे प्रकार रोखण्यासाठी बीयाणे व खत विक्री दुकानासमोर आपल्याकडे कोणत्या कंपनीचे बीयाणे व खत किती शिल्लक आहे त्याची किंमत याचा फलक दररोज दुकानासमोर शेतकऱ्यांना दिसेल अशा दर्शनी भागात लावावा व त्यावर देखरेख कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावी अशा सूचनाही केली आहे. प्रारंभी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी उस्मानाबाद जिल्ह्याची कृषीविषयक माहिती दिली. तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मंगरूळकर यांनी कृषी विभागाच्या कामाची माहिती दिली. या आढावा बैठकीस सर्व तालुका कृषी अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कृषी मंत्री भूसे यांनी जिल्हयात प्रवेश करताच शेतात सोयाबीन चांगले उगवले आहे की नाही ? यांची पाहणी करण्यासाठी त्यांनी बांगरवाडी शिवारातील चांगदेव रघुनाथ बांगर (वय 75) या शेतकऱ्यांच्या शेतात तसेच येडशी येथील विनोद पवार यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. तसेच त्यांच्याशी गप्पा मारत काही अडचण आहे का, नेमकी मदत काय लागते याबाबत माहिती घेतली. तर त्यांना धीर देत पेरलेले बीयाणे उगवले नसल्यामूळे खचून न जाता धीराने पुन्हा शेती करा असे सांगत आम्ही तुमच्या बरोबर असून काळजी करू नका अशी पाठीवर थापही दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील धीर आला.