मालवाहतूकदारांसाठी खूशखबर ! दंड भरण्यासाठी आता ‘आरटीओ’चे खेटे नाहीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नियमभंग केल्यामुळे आता वाहन मालकाला दंड भरण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जाण्याची गरज नाही. आरटीओच्या फिरत्या पथकांकडे दंड आकारणीसाठी मोबाईल डिवाईस देण्यात आले आहे. त्यामुळे दंड जागीच भरणे शक्य झाले आहे. राज्यातील 50 पैकी 47 आरटीओच्या फिरते पथकांना 230 मोबाईल डिवाईसचे वाटप करण्यात आले आहे.

जास्त क्षमतेने मालवाहतुक करणे, सिग्नल नियम मोडणे, अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालविणे, लायसन्स किंवा परवाना नसणे इत्यादी कारणांसाठी वाहन चालकांवर आरटीओच्या भरारी पथकाकडूनही कारवाई केली जाते. राज्यातील 50 आरटीओ व डेप्युटी आरटीओत एकू ण 65 भरारी पथक ही कारवाई करत आहेत. दंडाची कारवाई करताना वाहन चालकाला मेमो दिला जातो. त्यानंतर चालक किंवा मालक आरटीओत येऊन दंड भरतो.

मात्र बराच वेळही जातो. काही वेळा चालक दंड वेळेत भरत नाहीत. यावर उपाय म्हणून परिवहन आयुक्त विभागाने 47 आरटी व डेप्युटी आरटीओतील फिरत्या पथकांना हे डिवाईस दिले आहे. आरटीओ कर्मचारी नियम मोडणार्‍या वाहनाचा क्रमांक मोबाईल डिवाईसमध्ये टिपू शकतो. याशिवाय त्याने यापूर्वीचा दंड भरला आहे का, कर किंवा अन्य काही प्रलंबित आहे का तेही समजू शकणार आहे . नव्या व्यवस्थेमुळे वाहन चालकांना दंड भरण्यासाठी आरटीओत येण्याची गरज नाही. त्वरीत दंड भरल्यानंतर मोबाईल डिवाईसमधून त्यांना दंडाची पावतीही मिळेणार असल्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले.