लोकमान्य टिळकांचे ‘ते’ बोल ‘कोरोना’ संकट काळात प्रेरणादायी : सुबोध भावे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कितीही संकटं आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय रोवून उभा राहिन हे लोकमान्य टिळकांचे परखड बोल आज कोरोनाच्या संकाट काळात प्रकर्षानं आठवतात. त्यांचे हे बोल कायम स्मरणात ठेवल्यास संकटावर मात करण्यास बळ मिळेल असा आशावाद मराठी अभिनेता, दिग्दर्शक सुबोध भावे यानं व्यक्त केला.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती शताब्दीवर्षाच्या सांगता समारंभा निमित्त शनिवारी (दि 1ऑगस्ट) सुबोध भावे आणि कीर्तनकार चारूदत्त आफळे यांचा खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यानंतर मी आणि लोकमान्य या कार्यक्रमात सुबोधनं त्याचे अनुभव सांगितले.

सुबोध भावे म्हणाला, “लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाद्वारे लोकांना एकत्र तर आणलंच सोबतच त्यांनी अनेक लहान कार्यातून लोकांच्या मनातील स्वातंत्र्य लढ्याची आग धुमसत ठेवली. लोकमान्य टिळक हे ज्योतिष शास्त्राच गाढे अभ्यासक होते आणि गणिततज्ज्ञ म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्यांच्या मनात स्वातंत्र्यप्राप्तीचा रोड मॅप तयार होता. त्यानुसार त्यांची पाऊले टाकली जात होती. कोण, कशी, कोणती भूमिका निभवणार हे त्यांच्या गणितीय बुद्धीत स्पष्ट होतं.”

सुबोध पुढे म्हणाला, “सिनेमाच्या निमित्तानं टिळकांच्या चारित्र्यावर प्रकाशझोत टाकणारी अनेक पुस्तकं वाचनात आली. गंगाधर गाडगीळ यांचं दुर्दम्य, सदानंद मोरे यांचं लोकमान्य ते महात्मा हा द्विखंड, नं चिं केळकर यांनी लिहिलेलं पुस्तक अशा अनेक पुस्तकांचा माझ्यावर प्रभाव पडला होता. ही पुस्तके वाचल्यानंतर मला समजलं की, शाळेत शिकवले जातात त्यापेक्षा टिळक खूप वेगळे आहेत.”

सुबोध असंही म्हणाला, “गणेश उत्सवाचे आद्य प्रवर्तक केवळ या प्रतिमेतच आपण लोकमान्यांना अडकवलं आणि त्यातच त्यांच्या प्रतिमेचं विसर्जन केलं. लोकमान्यांचे कर्तृत्व आणि ध्येयवाद यापेक्षा खूप व्यापक होता. तो समजून घेतला तरच आपण लोकमान्यांना ओळखू शकू” असंही सुबोधनं सांगितलं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like