‘ये पब्लिक है, ये सब जानती है !’ कितीही झाकलं तरी सत्य लपणार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा सनसनाटी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला आहे. या आरोपानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे ज्या दिवसांचा परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केला आहे, त्या काळात अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात होते. मग सचिन वाझे देशमुखांना कधी भेटले? असा सवाल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यावर भाजप नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. देशमुखांना वाचवायचेच असा निर्णय राष्ट्रवादीने घेतलेला दिसतोय. 15 फेब्रुवारीला देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली होती, क्वारंटाईन काळात घेता येते का ? कितीही झाकल तरी सत्य लपणार नाही, ये पब्लिक है, ये सब जानती है, असे म्हणत दरेकर यांनी निशाणा साधला आहे.

प्रवीण दरेकर यांनी आपल्या ट्विटसोबत गृहमंत्री अनिल देशमुख यांचे 15 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे ट्विट देखील जोडले आहे तसेच, खरंच, स्वतःची चामडी वाचवण्यासाठी शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला या वयात आणखी किती सारवासारव करायला भाग पाडणार आहात? थोडा त्यांच्या ज्येष्ठतेचा तरी विचार करा, असे देखील प्रवीण दरेकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. केवळ अनिल देशमुख यांचा प्रश्न नाही, ते राज्याचे गृहमंत्री आहेत. परंतु राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत बेताल वक्तव्य करत असल्याचे देखील दरेकर यांनी म्हटले आहे