Video : मेट्रो कारशेडबाबत शरद पवार अहवाल वाचून प्रॅक्टिकल निर्णय घेतील : देवेंद्र फडणवीस

पोलीसनामा ऑनलाईन, पुणे, दि. 20 डिसेंबर : मुंबई-मेट्रो कारशेडचा गुंता आता दिवसेंदिवस वाढत चाललाय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हा प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थी करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिलीय.

खासदार शरद पवार यांनी मेट्रोबाबत अहवाल वाचावा. शरद पवार यांच्याशी आमचे कितीही मतभेद असले तरी पवारसाहेब अहवाल वाचतील तसेच प्रॅक्टिकल निर्णय घेतील. ते कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.

मेट्रो कारशेडचा प्रश्न सोडवण्यासाठी आता शरद पवार मध्यस्थी करणार आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिलीय. या वादावर शरद पवार पुढील एक-दोन दिवसांत पंतप्रधान मोदी यांच्याशी ते चर्चा करणार आहेत.

मेट्रो प्रकल्पात राज्य सरकार इतकाच निधी केंद्र सरकारचा देखील आहे. केंद्राच्या मदतीने जेआयसीएने या प्रकल्पाला वित्तपुरवठा केलाय. मुंबईकरांच्या हितासाठी केंद्र सरकारने यापूर्वी देखील महाराष्ट्राला सहकार्य करण्याची भूमिका घेतलीय. यापुढेही सहकार्याचीच भूमिका केंद्र सरकारची राहणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

‘आरे’च्या जागेला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिलीय. आरेची जागा अंतिम झाल्यानंतर काम देखील बरेच पुढे गेले असून 100 कोटी रुपयांचा खर्चही झालाय. लोकशाहीमध्ये चर्चेला आमची कायमच तयारी असते आणि चर्चेतून मार्गही निघतो.

मनात शंका असेल तर आज आरे कारशेडला जी जागा दिली, त्यापेक्षा एक इंच जास्त जागा भविष्यात दिली जाणार नाही, असा निर्णय करा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.

आता दुराग्रह सोडून द्यावा. तसेच मुंबईकरांच्या हितासाठी आरेच्या जागेवर कारशेडचा मार्ग तत्काळ प्रशस्त करावा, अशी आमची सरकारला विनंती असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.