राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत : एकनाथ खडसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील तीन पक्षांचे सरकार कधीही कोसळू शकते. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणूका होतील असे भाकीत भाजप नेते वर्तवत असले तरी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हा दावा खोडून काढला आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नसल्याचा दावा खडसे यांनी केला आहे. नवी मुंबई येथे भाजपचे राज्यव्यापी अधिवेशन सुरु असून यावेळी बोलताना खडसे यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार आहे. या सरकारमध्ये काही गोष्टींवर मतभेद आहेत. हे मतभेद आता उघड होऊ लागले आहेत. त्यामुळे तिढा वाढून हे सरकार मोडेल, पण राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे. यावेळी त्यांनी आपण पक्षात आजही सक्रीय असल्याचे स्पष्ट केले. मी पक्षातील एखाद्या व्यक्तीवर टीका केली असेल पण पक्षावर कधीही टीका केली नाही. मी नारज होतो, तरी देखील मी पक्षासाठी सक्रीय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे आम्ही निवडणुकीच्या कामाला लागलो आहोत, असे विधान मध्यंतरी केले होते. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करणार नाही, आम्हाला त्यामध्ये रस नाही. ते त्यांच्यातील मतभेदांमुळे पडेल, असे पाटील म्हणाले होते. चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य ताजे असतानाच एकनाथ खडसे यांनी हे विधान केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

You might also like