‘त्या’ गोष्टींमध्ये काही एक तथ्य नाही, देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारचा राज्य शासनाकडे असलेला निधी पुन्हा पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाले असल्याचा आरोप भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केला होता. मात्र हे सर्व आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले आहेत. तर केंद्र सरकारकडे एकही पैसा परत पाठवलेला नसून राज्य शासनाच्या अर्थ खात्याने याबाबत खुलासा करावा अशी फडणवीस यांनी मागणी केली आहे. निधी परत पाठवण्यासाठी मी मुख्यमंत्री झालो होतो यात काहीच तथ्य नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगीतले.

बुलेट ट्रेन हा विषय केंद्र सरकारशी निगडित आहे. भूसंपादनाचा विषय केवळ राज्य शासनाच्या निगडित येतो मात्र त्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी राज्य शासनाला दिला जात नसल्याचे सांगत केंद्राकडे ४० हजार कोटी रुपयांचा निधी परत पाठवण्यासाठी मी मुख्यमंत्री झालो असल्याचे वक्तव्याचे मी खंडन करतो असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस ४० हजार कोटी रुपये केंद्राकडे पाठवण्यासाठी थोड्या कालावधीसाठी मुख्यमंत्री झाले हे विधान एकदम चुकीचे आहे. केंद्र सरकारने बुलेट ट्रेन किंवा इतर कोणत्याही प्रकल्पासाठी राज्य सरकारकडे पैसे मागितलेले नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकल्पाचा पैसा केंद्र सरकारकडे परत पाठवलेला नाही. ज्याला सरकारची आर्थिक निर्णय प्रक्रिया समजते त्याला ही गोष्ट समजून येईल असे देखील फडणवीस यांनी सांगितले. अशा प्रकारे पैशांची देवाण घेवाण करता येत नाही त्यामुळे राज्याच्या अर्थ विभागाने याबाबत खुलासा करावा अशी मागणी देखील फडणवीस यांनी केली आहे.

काय म्हणाले होते हेगडे ?
एका कार्यक्रमात बोलताना हेगडे यांनी ही खळबळजनक माहिती दिली. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात आमचा माणूस फक्त ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाला होता, हे सगळं नाटक त्यांनी का केलं ? आपल्याकडं बहुमत नाही हे आम्हाला माहीत होतं. तरीही फडणवीस मुख्यमंत्री का झाले, असा प्रश्न सगळे करताहेत. तर त्याचं उत्तर आहे, ४० हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी.’

‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात त्यावेळी केंद्र सरकारचे ४० हजार कोटी रुपये होते. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचं सरकार तिथं आल्यास त्या पैशांचा दुरुपयोग केला जाईल. विकासासाठी ती रक्कम वापरली जाणार नाही, हे त्यांना माहीत होतं. त्यासाठीच हे सगळं नाट्य घडवून आणलं गेलं. फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अवघ्या १५ तासांत केंद्राचे ४० हजार कोटी परत केले गेले,’ असे हेगडे म्हणाले होते.

Visit : Policenama.com