पुण्यात लग्न सोहळ्यासाठी कडक नियम, व्हिडीओ पोलिसांत जमा करावा लागणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोविड-19 च्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याच्या घटना समोर येत असून याचा परिणाम शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने शहरी व ग्रामीण भागात विवाह समारंभासाठी नव्याने आदेश जाहीर केले आहेत. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी ‘मिशन बिगेन अगेन’चा भाग म्हणून जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने नवे निर्देश जाहीर करण्यात आले असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

विवाह समारंभासाठीचे हे नवे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी जाहीर केले आहेत. यामध्ये नागरिकांनी आणि मंगल कार्यालयांच्या मालकांनी कार्यक्रमस्थळी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमावलीचे कडक अंमलबजावणी होत आहे की नाही याची खात्री करावी असं म्हटलं आहे. तसेच 50 पेक्षा अधिक पाहुण्यांना विवाह समारंभाला हजेरी लावता येणार नाही, यामध्ये स्वयंपाकी, वेटर्स आणि सांगितिक कार्यक्रम करणाऱ्या कलाकारांचाही समावेश आहे.

याशिवाय विवाह समारांभाच्या आयोजकांनी कार्यक्रमाचे व्हिडीओ चित्रीकरण करुन पुढील पाच दिवसांत ते पोलीस ठाण्यात जमा करावे. तसेच आयोजकांना कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्यांची यादीही जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करावी लागेल, असे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी जाहीर केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसारच्या या नव्या आदेशात म्हटले आहे की, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलिसांनी भरारी पथकं नेमून कार्यक्रमस्थळी भेट देऊन संबंधित ठिकाणी नियमांचे पालन केले जात आहे किंवा नाही याची खात्री करावी. जर नियमांचे उल्लंघन होत असेल तर या भरारी पथकाने पोलिसांत तक्रार दाखल करावी.

असे आहेत नवीन नियम

1. जास्तीत जास्त 50 लोकांनाच समारंभात हजर राहता येईल. या लोकांना एकमेकांमध्ये 6 फुटांचे अंतर राखणे बंधनकारक आहे. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे योग्य प्रकारे पालन होत आहे किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी दोन व्यक्तीवर जबाबदारी सोपवण्यात यावी.
2. 50 लोकांची यादी (व्हिडीओग्राफर्स, सांगितिक कार्यक्रम करणारे कलाकार, निवेदक यांच्यासह) स्थानिक पोलीस ठाण्यात जमा करावी लागेल. तसे सर्व निमंत्रक (भटजी, वाजंत्री, वेटर्स) यांनी तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे.
3. कार्यक्रमस्थळी मद्य सेवन आणि गुटखा, पान मसाला खाण्यास परवानगी नाही. हे पदार्थ खाऊन कार्यक्रमस्थळी थुंकल्यास दंडनीय गुन्हा असेल.
4. वातानुकुलीत व्यवस्था कार्यक्रमस्थळी वापरता येणार नाही.
5. कार्यक्रमात वापरण्यात येणाऱ्या खुर्चा, टेबल, किचन, जेवणाची जागा, वॉशरुम्स हे सातत्याने निर्जंतुक करणे आवश्यक.
6. जर नियमांचा भंग झाल्याचे आढळल्यास लग्नाचा हॉल, लॉन्स किंवा इतर जागा जिथे कार्यक्रमाचे आयोजन केले असेल तो तात्काळ बंद करण्यात येईल.
7. लग्न समारंभाचे चित्रीकरण करण्यात आलेली सीडी स्थानिक पोलीस ठाण्यात कार्यक्रमानंतर पाच दिवसांच्या आत जमा करावी.