‘फुकटचा माज दाखवू नका, मी माफी मागणार नाही’ – कंगना रानौत

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेत्री कंगना रानौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटाला करणी सेनेकडून कडकडून विरोध होत आहे. ‘मणिकर्णिका’ चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करणी सेनेचा आहे. म्हणूनच करणी सेनेकडून कंगनाला लक्ष्य केलं जात आहे. करणी सेनेकडून येणाऱ्या धमक्यांना कोणत्याही प्रकारची भीक न घालता. कंगना म्हणाली माझ्या मार्गात आलात तर एकालाही सोडणार नाही. इतकंच नाही तर तिनं करणी सेनेची माफी मागायलाही नकार दिला आहे.

‘मी इथे कोणाचीही माफी मागायला आलेली नाही. फुकटचा माज मला कोणीही दाखवू नये. मी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही. राणी लक्ष्मीबाई या देशाच्या अभिमान आहेत त्यांची प्रतिमा मलिन होईल असं कोणतंही दृश्य चित्रपटात दाखवण्यात आलेलं नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही’ असं कंगनानं स्पष्ट करत पुन्हा एकदा करणी सेनेच्या धमक्यांकडे दुर्लक्ष केलं आहे.

करणी सेनेने या आधी कंगनाला धमकी दिली होती जर ‘कंगनाने आमच्या कार्यकर्त्यांविरोधात जाण्याचा प्रयत्न केला तर तिला महाराष्ट्रात फिरकू देणार नाही. तिच्या चित्रपटांचे सेट जाळून टाकू’. या व्यतिरिक्त करणीसेना आपल्याला वारंवार धमक्या येत असल्याचा आरोप कंगनानं केला होता. ‘धमक्या देणं करणी सेनेनं थांबवलं नाही तर माझ्या मार्गात येणाऱ्या एकालाही मी सोडणार नाही मी सुद्धा एक राजपूत आहे’ असा इशारा तिनं दिला होता.

‘मणिकर्णिका’ चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनावेळी करणी सेना नक्कीच आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करेल असंही अनेकांचं म्हणणं आहे मात्र आपण या संकटाला तोंड देण्यास समर्थ आहोत पण इथे माफी मागायचा प्रश्न येत नाही असं कंगनानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.