‘जे ठरलंय त्याप्रमाणे करा’ एवढाच शिवसेनेचा एका ओळीचा ‘प्रस्ताव’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्ही लवकरात लवकर सरकार स्थापन करणार असून आम्ही सेनेला प्रस्ताव पाठवला आहे. आता आम्हाला शिवसेनेच्या प्रस्तावाची प्रतिक्षा आहे. अशी माहिती दिली. यावर युतीची चर्चा होत असताना जे ठरलं होतं त्याप्रमाणे करा, वेगळा प्रस्ताव देण्याची गरज आम्हाला वाटत नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत म्हणाले की , ‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू नये, अशी आमची भूमिका आहे. राष्ट्रपती राजवट लागली तर तो जनतेचा अपमान ठरेल. राज्यात चांगलं सरकार यावं, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री व्हावा. १२ दिवसांनंतर भाजपाकडून काही सकारात्मक आणि समंजसपणाचे निवेदन आले आहे. माझ्या मते भाजपाला वेगळा प्रस्ताव देण्याची गरज नाही. युतीची चर्चा होत असताना जे ठरलं होतं त्याप्रमाणे करा, वेगळा प्रस्ताव दिला पाहिजे, असे वाटत नाही. जे ठरलं आहे त्याप्रमाणे करा एवढाच आमचा एका ओळीचा प्रस्ताव आहे.’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

Visit : Policenama.com