‘निपाह’चा धोका नसला तरी नागरिकांनी, रूग्णालयांनी काळजी घ्यावी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गेल्यावर्षी केरळमध्ये निपाह व्हायरसने धुमाकुळ घातला होता. निपाहने त्यावेळी १७ बळी घेतले होते. आता पुन्हा केरळातच निपाहची बाधा झालेला रूग्ण सापडल्याने भितीचे वातावरण आहे. केरळ सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, हा व्हायरस अन्य ठिकाणी पसरण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्रात सध्या तरी निपाह व्हायरसचा धोका नाही. मात्र, नागरिकांनी तसेच रूग्णालयांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आरोग्य विभागाने केले आहे.
केरळात निपाहचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. केरळ वगळता अन्य राज्यात अद्याप तरी निपाहची लागण झाल्याचे वृत्त नाही. महाराष्ट्रात निपाहची भीती सध्या तरी नसल्याचा निर्वाळा आरोग्य विभागाने दिला आहे. राज्याच्या संसर्गजन्य नियंत्रण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात अद्याप निपाहचा एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे कोणताही हाय-अलर्ट जारी केलेला नाही. मात्र, नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आजारपण अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
निपाहला प्रतिबंध करण्यासाठी झाडावरून जमिनीवर पडलेली फळे खाऊ नयेत. तसचे या आजाराची संशयित लक्षणे दिसून आल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या आजारावर कुठल्याही प्रकारचे औषध नसल्याने विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

निपाहची लक्षणे
श्वास घेण्यास त्रास होणे
न्यूरोलॉजिकल समस्या
अंगदुखी
मेंदूज्वर
ताप अधिक काळ राहणे
डोकेदुखी
सतत उलट्या होणे