Ashadhi Wari 2019 : पालखी मार्गावरील दारूदुकानं, मांसविक्रीवर बंदी ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – येत्या २५ जून २०१९ रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे, तर दिनांक २४ जून २०१९ रोजी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या काळात पुण्यात अनेक वारकरी असतात. मात्र यंदाच्या वारी कालावधीमध्ये पालखी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी आणि मार्गावर दारूदुकाने मांस आणि मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केल्या आहेत. पालखी सोहळ्याच्या प्रशासकीय तयारीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हे आदेश दिले.

पुणे जिल्ह्यातील पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पालखीमार्गावर मांसाहारी हॉटेल, मच्छी मार्केट, कत्तलखाने व दारूची दुकाने बंद ठेवावीत, या सोहळ्यामध्ये सामील असणाऱ्या वाहनांची तपासणी करणे व त्यांना फिटनेस प्रमाणपत्र देणे, वाहतुकीचे नियोजन, सुरळीत विद्युतव्यवस्था या बाबींवर देखील चर्चा झाली. त्याचबरोबर वारकऱ्यांना मुक्कामाच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा, शासकीय दरामध्ये रॉकेल, धान्य, अखंडित वीजपुरवठा करण्याबाबत संबंधित यंत्रणांना आदेश देण्यात आले.पालखी सोहळ्याच्या प्रशासकीय तयारीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.

पाणीपुरवठ्याचे नियोजन

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वारीच्या काळात पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी, पालखीतळांवरील खड्डे मुरुम भराई करून व्यवस्थित करणे, आवश्यक त्या ठिकाणी रोिंलग करणे, पालखीतळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दुकानदारांकडून होणाऱ्या अतिक्रमणांबाबत तसेच पालखीमध्ये सामील वाहनांच्या पाार्किंगबाबत चर्चा करण्यात आली ; तसेच याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या.

वाहतूक नियोजन

हडपसर ते दिवेघाटमार्गे सासवड यादरम्यानच्या पालखीमार्गावर वाहतूक पूर्णपणे बंद करून ती बोपदेव घाटमार्गे वळवावी, अशी मागणी दिंडी आणि संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. याबाबत पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणी करून वाहतुकीसंदर्भातील अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी पुरवठा विभागाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच अग्निशमन यंत्रणा यांचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियोजनाबद्दल चर्चा केली.

या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयिंसह देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, अमर माने, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग एस. एम. कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, हवेली, बारामती, इंदापूर, पुरंदर तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे प्रमुख विश्वस्त तसेच श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र देहूचे पालखी सोहळाप्रमुख तसेच दोन्ही संस्थानचे प्रमुख विश्वस्त, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

You might also like