एकनाथ खडसे पक्षांतर करणार का ? मिळालं ‘हे’ उत्तर

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे. भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे हे पक्षांतर करणार असल्याची चर्चा रंगली आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत आपण कोणताही निर्णय घेतलेला नाही. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्याला तसा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही असं स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबद्दल खडसेंशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गेल्या 2 महिन्यांपासून मी आजारपणामुळं मुक्ताईनगरमध्ये आहे. माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याआधी शिवसेना आणि काँग्रेस प्रवेशाचीही चर्चा होती. मात्र मी अद्याप पक्षांतराबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही. तसा काही निर्णय घेतला तर तो मी स्वत: जाहीर करेन असंही खडसेंनी स्पष्ट केलं.

गेल्याच आठवड्यात एकनाथ खडसेंनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला केला होता. फडणवीसांनी त्यांना त्रास दिला असा जाहीर आरोप त्यांनी केला होता. पक्षानं अन्याय केल्यानं पक्षात राहू नये असा सूरही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

यानंतर खडसे शिवसेनेत जाणार की, राष्ट्रवादीत याबद्दल चर्चा सुरू आहे. शिवसेना नेते तथा राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांना शिवसेनेत येण्याचे आवाहन केले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही खडसे पक्षात आले तर स्वागत आहे अशी प्रतिक्रिया दिली होती.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्यात येऊन आढावा घेणार होते. मात्र पक्षाचे नेते शरद पवारच आढावा घेत असल्यानं या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.