‘पोलिस दलात पैसे खात नाही असा कर्मचारी, अधिकारी नाही’ – निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. आता याच पार्श्वभूमीवर माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. पोलीस दलात असा अधिकारी, कर्मचारी नाही जो पैसे खात नाही किंवा एकही पोलीस ठाणे नाही जिथे पैसे जमा होत नाहीत, असा मोठा दावा केला आहे.

बोरवणकर म्हणाल्या की, पोलीस दलामध्ये पैसे खात नाही असा अधिकारी, कर्मचारी नाही. प्रत्येक पोलीस स्थानिक राजकीय पक्षांची सोय आणि पैसे कमावण्याचा अड्डा झाला आहे. या ठिकाणी राजकारण्यांना हव्या तशा नियुक्त्या केल्या जातात. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण गेल्यानंतर परिस्थिती बिघडल्याचे बोरवणकर म्हणाल्या. यावेळी त्यांनी आपला एक किस्साही सांगितला. पुण्यात असताना 2 एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी आपल्यावरही आरोप झाल्याचे त्या म्हणाल्या. पोलीस दलात जात आणि विचारधारेवर आधारीत पोलीस अधिकारी आहेत. ते त्याप्रमाणेच वागत असल्याचा दावाही बोरवणकर यांनी केला आहे. यावेळी त्यांनी सचिन वाझे प्रकरणावरही भाष्य केले आहे. त्यांनी एकट्याने करणे शक्य नाही. वाझे यांच्यामागे अनेक जण असणार आहेत. गुन्हे शाखा हे खंडणी वसुली केंद्र झाले आहे. गृहमंत्री देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्या आरोपांची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, असे बोरवणकर म्हणाल्या.