पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना कोणाचा बापही हरवू शकत नाही : महादेव जानकर 

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या ६९व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आठवणीतील मुंडे साहेब’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महादेव जानकर यांनीदेखील उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांना कोणाचा बापही हरवू शकत नाही अशी टीका मुंडे यांचे नाव न घेता जानकर यांनी केली.

आठवणीतील मुंडे साहेब या कार्यक्रमात महादेव जानकर म्हणाले की, जो कोणी व्हाट्सवर म्हणतोय की, मीच निवडून येणार त्याला चॅलेंज देऊन सांगतो की बीड आणि परळी मधून प्रीतम आणि पंकजा मुंडेच निवडून येतील. प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांना कोणाचा बापही हरवू शकत नाही. अशी टीका त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केली.

बारामतीत हरलो आणि नॅशनल हिरो झालो
पुढे बोलतांना ते म्हणाले, ताई तुमचा आशीर्वाद राहू द्या पुन्हा कुस्ती खेळायची आहे. बारामती निवडणूक हरलो आणि नॅशनल हिरो झालो. आता पुन्हा बारामतीमधून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. ‘भगवी वस्त्र घातले तर महाराज बनेल मला कुठला स्वार्थ नाही, त्यामुळे पंकजा ताईंना सोडण्याचं कारणच नाही’ असंही जानकर म्हणाले.

लेट कमर पंकजा मुंडेंनी दिले स्पष्टीकरण
पिंपरी-चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाट्यगृहात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ‘आठवणीतील मुंडे साहेब’ हा कार्यक्रम मुंडे यांच्या ६९ व्या जयंती निमित्त ठेवण्यात आला होता. परंतु राज्य मंत्री पंकजा मुंडे या नेहमीप्रमाणे दोन तास उशिरा आल्या. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी उशीर झाल्याची कबुली दिली आणि त्यासाठी विकास कामं जबाबदार असल्याचं म्हणाल्या. त्या म्हणाल्या की,पुण्यामध्ये विकास कामं सुरू आहेत.  मुंडे साहेबांना कार्यक्रमांसाठी नेहमी उशीर व्हायचा, मलाही होतो तरी देखील लोकं वाट पाहतात. मुंडे साहेब सकाळी आठच्या सुमारास घरातून निघत परंतु त्यांना रस्त्यात लोक भेटायची त्यामुळे त्यांना कार्यक्रमांना उशीर व्हायचा. मीही लोकांना भेटल्यामुळे उशीर होतो. त्यात आणखी एक कारण म्हणजे रस्ते खराब असायचे, परंतु आता मात्र कामाच्या विकासामुळे उशीर होत आहे. महाराष्ट्रात रस्ते,मेट्रो आणि पुलाचे जाळे उभारले जात आहे, असं म्हणत त्यांनी सरकार विकासकामे करीत असल्याचे संकेत दिले.