१ एप्रिलपासून कर चुकवत असाल तर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- कर भरणाऱ्या प्रत्येक माणासासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर कोणी कर भरणे चुकवत असेल तर आता नव्या आर्थिक वर्षापासून कोणतीही करचुकवेगिरी शक्य होणार नाही. यासाठी प्राप्तिकर विभागाने एक योजना आखली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून होणार आहे. एक एप्रिलपासून भारत नव्या कर पर्वात प्रवेश करणार आहे. करकक्षा अधिक विस्तारणे व करचुकवेगिरी नष्ट करणे प्रप्तिकर विभाग सोशल मीडियाचा आधार घेणार आहे.

अनेकजण असे असतात की जे महागडी गाडी घेतात, विदेश पर्यटन करतात आणि त्यांचे फोटोज सोशलवर शेअर करतात. यात अनेकजण असे असतात की, जे करकक्षेत नसतात, तसा संशयही प्राप्तिकर विभागाला आहे. त्यामुळे आता अशा करचुकव्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्राप्तिकर विभाग फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियाचा आधार घेणार आहे. आतापर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या उत्पन्नाच्या स्तोताबाबत प्राप्तिकर विभागाला केवळ बँकेकडून दिल्या जाणाऱ्या माहितीवर अवलंबून रहावे लागत होते. करचुकवेगिरी करण्यासाठी बँकांमध्ये माफक व्यवहार करण्याची चलाखी असंख्य नागरिकांकडून केली जाते. यावर उपाय म्हणून आता सोशल मीडियाचा आधार घेतला जाणार आहे.

यासाठी प्राप्तिकर विभागाकडून एक योजना आखली जाणार आहे. या योजनेची सुरुवात एक एप्रिलपासून होणार आहे. कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी १५ मार्चपासूनच प्रोफाइल निर्मितीच्या कामास सुरुवात केली आहे. करकक्षा रुंदावणे व करचुकवेगिरी रोखणे ही प्रमुख उद्दिष्टे आखून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.

नेमकी योजना काय ?
प्रोजेक्ट इनसाइट या पोर्टलमध्ये करपात्र उत्पन्न असलेल्या तसेच, कमी उत्पन्न असलेल्या प्रत्येक नागरिकाचे परिपूर्ण प्रोफाइल प्राप्तिकर अधिकाऱ्यांकडून तयार करण्यात येणार आहे. प्राप्तिकर विभागाच्या परवानगीनंतरच ही योजना आखण्यात आली आहे. बँका, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी माध्यमांतून जवळपास प्रत्येक नागरिकाचे स्वतंत्र प्रोफाइल करण्यात येईल. यामध्ये नागरिकांच्या उत्पन्न व खर्चाचा तपशील, निवासी पत्ता, स्वाक्षरीचा नमुना, प्राप्तिकर विवरणपत्र आदी माहिती नोंदवण्यात येईल. ह्या तपशीलाची पडताळणी प्राप्तिकर खात्याकडे असलेल्या त्या व्यक्तीच्या उत्पन्न आणि कराशी केली जाईल. जर त्यात विसंगती आढळली आणि संबंधित व्यक्ती कर चुकवत आहे असा संशय आला तर त्या संशयित व्यक्तींच्या निवासस्थानी तसेच कार्यालयांवर छापे टाकण्याचा मार्गही प्राप्तिकर विभागासमोर असणार आहे.

भारत सामील होणार मोजक्या देशांच्या पंक्तीत
प्राप्तिकर विभागाने तयार केलेली ही योजना अंमलात आणल्यानंतर भारताचा मोजक्या देशांच्या पंक्तीत समावेश होणार आहे. बेल्जियम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन या देशांमध्ये करचुकवेगिरी रोखण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. सदर देशांना या अनोख्या योजनेमुळे खूपच फायदा झाला. ही योजना अंमलात आणल्यानंतर तेथील कर महसूलात वाढ झाल्याचे दिसून आले.