Serum Institute Fire : चौकशीनंतरच आगीचे कारण समोर येईल – अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेली आग आटोक्यात आलेली आहे. घटनास्थळी सीरमचे वरिष्ठ अधिकारी, पुणे शहराचे पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी सध्या आहेत. मी व स्थानिक आमदार चेतन तुपे आम्ही तिथं पाहणी केली. आग नक्की कशामुळे लागली हे अद्याप कोणीही सांगू शकत नाही. उद्या विविध पथकं येऊन घटनास्थळाची पाहणी करतील व त्यानंतरच आगीत किती जीवितहानी झाली हे समजेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. सीरम इन्स्टिट्यूच्या ज्या इमारतीत आग लागली त्या घटनास्थळाला अजित पवार यांनी भेट दिली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, सुरुवातीस असं सांगण्यात आलं होतं की कुठलीही जीवितहानी झालेली नाही. त्याचं कारणं असं होतं की, सीरम इन्स्टिट्यूटमध्ये जे अधिकारी, कर्मचारी व कामगार काम करत होते. ते सर्वजण बाहेर आले आहेत, असं लक्षात आलं होतं. त्यामुळे असं वाटलं होतं की कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, त्या ठिकाणी काम सुरु होतं. ठेकेदाराची लोकं तिथं काम कर होते. नंतर आग विझवत असताना जेव्हा अग्निशमन दलाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहचले तेव्हा तिथे पाच मृतदेह आढळून आले.हे मृतदेह संपूर्ण जळालेल्या अवस्थेत होते.

मृतांमध्ये पाचही जण पुरुष असल्याचे प्राथमिक माहितीमधून समजले आहे. पाच पेक्षा अधिक मृत्यू झालेले नाहीत, असा 99 टक्के अंदाज आहे. पण 100 टक्के यासाठी म्हणत नाही कारण, आता तिथं अंधार आहे, सर्व दिवे बंद आहेत. अजूनही तिथं धूर आहे. हा धूर पूर्णपणे बाहेर कसा निघेल यासाठी अग्निशमन विभाग प्रयत्न करत आहे. तसेच उद्या मुख्यमंत्री देखील घटनास्थळाला भेट देणार आहेत. कोरोना वॅक्सीन ज्या ठिकाणी बनवलं जात. त्या ठिकाणचं काहीही नुकसान झालेलं नसल्याचे अजित पवार यांनी सांगितलं,