अजित पवारांचा भाजपला टोला, म्हणाले – ‘विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला घाबरलो असतो, तर…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बहुमत असताना देखील घाबरणारे सरकार आपण कधीच पाहिले नसल्याची बोचरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. सरकारमध्ये एवढे बहुमत असताना एवढे घाबरायचे कशाला ? असा सवाल उपस्थित करत असे घाबरट सरकार आतापर्यंत पाहिले नसल्याची टीका फडणवीस यांनी केली होती. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, जर आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला घाबरलो असतो तर, आम्ही राजीनामाच देऊ दिला नसता. मला आणि मुख्यमंत्र्यांना भेटून नाना पटोले यांनी राजीनामा दिला, असे त्यांनी सांगितले.

अजित पवार पुढे म्हणाले, विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीला कोणीही घाबरत नाही, ज्यावेळी एखाद्याला सरकार चालवायचं असते, त्यावेळेस कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाण्याची त्यांची तयारी असावी लागते. निवडणुकीला घाबरलो असतो तर विधानसभा अध्यक्षांचा राजीनामाच आम्ही होऊ दिला नसता. मला आणि मुख्यमंत्र्यांना बोलून नाना पटोले यांनी राजीनामा दिला. यापूर्वीच त्यांच्या हायकमांडने सांगितले आणि नंतर ते आम्हाला महाविकास आघाडीचे सदस्य म्हणून भेटले. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.

सरकारला कोणताही धोका नाही
तुम्हाला आठवत असेल की सांगितले जात होते की, हे सरकार तीन महिने चालेल, त्यानंतर सहा महिने झाले, नऊ महिने झाले आता सव्वा वर्षे होत आली. प्रत्येक वेळी तीन-तीन महिने ते वाढवत आहेत. सध्या तरी महाविकास आघाडीच्या सरकारला कोणताही धोका नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे सरकार सुरळीत कामकाज करत आहे. तसेच सरकारमधील तिन्ही पक्ष एकोप्याने काम करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

अधूनमधून हायकमांडशी चर्चा
महाविकास आघाडीचे सरकार चालवत असताना अधूनमधून शरद पवार यांच्यासारख्या नेत्याचे मार्गदर्शन मिळते. तसेच काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी या देखील मुख्यमंत्र्यांशी वेळोवेळी चर्चा करतात. जर बैठक घेतली तर बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे उपस्थित असतात. सर्वजण चर्चा करुन सरकार चालवण्याचे काम करत असून सरकारला कोणतीही अडचण नाही, असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.