कोणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरूपी राहत नाही : एकनाथ खडसे 

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – कोणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरूपी तिथं राहत नाही, असं सांगत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. भुसावळ तालुक्यात दीपनगर इथे लेवा समाजाच्या गुणवंतांचा गौरव सोहळ्याला खडसे उपस्थित होते. काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी खडसेंवर झालेल्या अन्यायाला व्यासपीठावर वाचा फोडून खडसेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं आवाहन केले.

खडसे यांनी अनेक वेळा भाजपला खडे बोल सुनावले होते. दरम्यान, आज पुन्हा नाराजी व्यक्त करताना खडसे म्हणालेत, अन्याय झाला तेव्हा वेळीच प्रतिकार देखील करायला हवा, तरच समोरच्याला आपल्या शक्तीची जाणीव होते. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये जळगावात जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक शहरातल्या एमआयडीसी परिसरातल्या बालाजी लॉन इथे पार पडली. प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. मात्र या बैठकीला एकनाथ खडसे अनुपस्थित होते.

वेळोवेळी खडसे यांनी नाराजी व्यक्त करत आले आहेत. मात्र, पक्षाने त्यांची दखल घेतलेली नाही. आज त्यांनी भाजपला सूचक इशारा दिलाय. आपल्यासमोर काँग्रेसचा पर्याय उपलब्ध असल्याचे दाखवून दिलेय. याआधी काँग्रेसचे खासदार आणि प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी खडसे यांना पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले होते. आता पुन्हा एकदा काँग्रेसने त्यांना आवाहन केलेय. त्यामुळे खडसे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर भाजपला तो मोठा धक्का असेल.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी आणखी मजबूत करण्यासाठी जळगावत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या महत्त्वपूर्ण बैठकीला खडसे अनुपस्थित होते. या बैठकीला खास निरोप पाठविलेल्या पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रित केलं होतं. याबाबत जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी जाहीर केले. त्यानंतर माजी आमदार नाराज झालेत. त्यांनी बैठकीतून बाहेर पडणे पसंत केले. परंतु या बैठकीला गिरीश महाजन उपस्थित राहिले. मात्र माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मात्र या महत्वपूर्ण बैठकीला दांडी मारली.