पेन्शन, CM वेतन न घेताही ममता बॅनर्जींचा वैयक्तिक खर्च कसा चालतो? स्वतः सांगितलं..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये आपली सत्ता कायम राखली आहे. तर आज बॅनर्जी या बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून हॅट्रिक मारत शपथ घेणार आहेत. याआधी ममता बॅनर्जी यांनी केंद्रात सुद्धा अनेक खात्याचा पदभार सांभाळला आहे. मागील ४५ वर्ष राजकारणात आपलं पाऊल ठेऊन असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी या विधानसभेत आपला गड मजबूत ठेवला आहे. यामुळे सर्वोतोपरी त्यांचं कौतुक देखील होत आहे. तर ममता बॅनर्जी यांनी एका मुलाखती दरम्यान स्वतः च्या खर्चाचे गणित उलगडून सांगितलं आहे.

ममता बॅनर्जी यांनी मागील ७ वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून मिळणारे पेन्शन घेतलेले नाही, तसेच मुख्यमंत्री म्हणून मिळणारे वेतन देखील घेतलेले नाही. मग त्यांचे वैयक्तिक खर्चाचं काय? सर्व खर्च कशा भागवतात? ‘जनसत्ता’ने दिलेल्या एक मनोरंजक माहिती नुसार, अनारकलीऑफ आरा’सारख्या काही चित्रपटांचे दिग्दर्शक अविनाश दास यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. त्या व्हिडिओमध्ये ममता बॅनर्जी माहिती सांगत आहेत. त्यांना केंद्राकडून जवळजवळ ७५ हजार रुपये पेन्शन मिळते. परंतु, ७ वर्ष ममता बॅनर्जी यांनी ती पेन्शन घेतलेली नाही. तसेच, त्या कोणतेही गाडी वापरत नाहीत. प्रवास करायचा असेल तर त्या स्वतःच्या पैशाने प्रवास करतात. तसेच, कुठे गेस्ट हाउसमध्ये राहायची वेळ आली, तरी त्या सरकारी पैसे न वापरता स्वतः पैसे खर्च करतात. असे त्यांनी त्या मुलाखतीत सांगितले आहे.

ममता बॅनर्जी यांचा खर्च कसा चालतो?

ममता बॅनर्जी यांनी मुलाखती दरम्यान त्या व्हिडिओत म्हटलं आहे की, ममता यांची आतापर्यंत ८६ ते ८७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये अनेक बेस्टसेलर पुस्तके त्यामध्ये समाविष्ट आहेत. त्या पुस्तकांच्या विक्रीतून जे मानधन मिळते. ते त्यांच्यासाठी पुरेसे आहे असे त्यांनी त्यावेळी म्हटले आहे. याव्यतिरिक्त ममता बॅनर्जी या काही गाणी देखील लिहितात. त्याद्वारे सुद्धा त्यांना पैसे मिळतात. तसेच, ममता यांना त्यांना चित्रं काढण्याचा, रंगवण्याची आवड सुद्धा आहे. म्हणून त्या चित्रांच्या विक्रीतून जे पैसे मिळतात, ते पैसे त्या दान करतात. या दरम्यान, ज्या कंपनीला त्या गाणी लिहून देतात, त्या कंपनीकडून त्यांना वर्षाला ३ लाख रुपये मिळतात. पुस्तकांच्या विक्रीतून त्यांना वर्षाकाठी १० ते ११ लाख रुपये मिळतात.’ तसेच एवढे पैसे सहज पुरतात, कारण मी एकटीच आहे, त्यामुळे माझा खर्च अधिक नाही. असे त्यांनी मुलाखती दरम्यान माहिती दिली आहे.