Lockdown : ‘कोरोना’मुळे कोठेही विशेष रेल्वे सोडण्याचा कोणताही विचार नाही, रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण

पोलीसनामा ऑनलाइन –  देशभरात कोरोनाचा कहर कमी होत नसल्यामुळे कोणत्याही राज्यात विशेष रेल्वे सोडण्यात येणार नसल्याचे स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. काही माध्यमांनी परराज्यातील कामगारांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा विचार रेल्वेकडून सुरु असल्याचे वृत्त दिल्याचे मंत्रालयाने खंडण केले आहे.

लॉकडाउनच्या काळात विविध शहरांमध्ये अडकून पडलेल्या परराज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याचा विचार रेल्वे विभागाकडून सुरु असल्याच्या माध्यमांतील वृत्ताचे रेल्वे मंत्रालयाने खंडन केले आहे. लॉकडाउन संपेर्यंत अर्थात 3 मे पर्यंत असे कुठलेही नियोजन नसल्याचेही रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशभरात सर्व प्रकारची प्रवासी रेल्वे सेवा 3 मे पर्यंत पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.

विविध शहरांमधील स्थलांतरितांच्या झालेल्या गर्दीला त्यांच्या गावापर्यंत सोडण्यासाठी कोणत्याही विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा विचारही नाही. रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये रेल्वे मंत्रालयाने माध्यमांना आवाहन केले की, या स्पष्टीकरणाची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच या संदर्भात कोणतीही चुकीची बातमी येणार नाही याची काळजी घेऊन आमची मदत करण्याचे म्हटले आहे. 3 मे पर्यंत रद्द झालेल्या ज्या रेल्वे गाड्यांचे बुकिंग झाले आहे त्याचे पैसे प्रवाशांना पूर्णपणे परत करण्यात येतील. यासाठी प्रवासांना त्यांचे बुकिंगचे तिकीट रद्द करण्याची गरज नाही. तसेच ज्या प्रवाशांनी त्याचे तिकीट रद्द केले आहे, त्यांनाही पूर्ण रिफंड देण्यात येणार आहे.