…नाही तर मनसेचा ‘खळ्ळखट्याक’चा इशारा

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – अभिजित देशपांडे दिग्दर्शित ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ सिनेमा सध्या बॉक्सआॅफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्राईम टाईम द्या, अन्यथा पीव्हीआर व सिनेमॅक्समध्ये तोडफोड करु, असा इशारा कल्याण मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी दिला आहे. या ठिकाणी सिनेमाला प्राईम टाईम शो न दिल्यामुळे कल्याणमध्ये मल्टिप्लेक्स चालकांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. काशीनाथ घाणेकर सिनेमाचा दिवसभरात केवळ एकच शो होत असल्यानं प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ८ नोव्हेंबरला रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. सर्वत्र सिनेमाचे कौतुक केले जात आहे. कल्याणमध्ये बहुंताश परिसर हा मराठी भाषिक आहे, मात्र सिनेमॅक्स थिएटरमध्ये या सिनेमाचा केवळ दुपारी तीन वाजताच शो आहे. यामुळे सिनेरसिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, अमिताभ बच्चन- आमिर खान यांच्या ठग्ज आॅफ हिंदोस्तान सिनेमाचे दिवसभरात तब्बल ८ शो सुरू आहेत. सिनेमामध्ये मोठी स्टारकास्ट आहे, मात्र कथेमुळे प्रेक्षकांची निराशा झाल्याने ठग्ज आॅफ हिंदोस्तानकडे पाठ फिरवली गेली आहे. एकूण हा सिनेमा बॉक्सआॅफिसवर आपली जादू पसरवण्यात कमी पडला आहे. या तुलनेत काशीनाथ घाणेकर सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले आहे. पण थिएटरमध्ये सिनेमाला प्राईम टाईमच देण्यात आलेला नाही. याविरोधातच मनसे आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर, सिनेमांना आज प्राईम टाईम न मिळाल्यास मल्टिप्लेक्स फोडण्याचा इशारा कौस्तुभ देसाई यांनी दिला आहे. यासाठी मल्टिप्लेक्स चालकांना दुपारपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.