बैठकीत एकही प्रस्ताव मान्य नाही, मराठा तरुणांना सोडलं वाऱ्यावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आझाद मैदानावर मागील 35 दिवसांपासून मराठा समाजाचे तरुण विविध मागण्यासाठी आंदोलन करत आहेत. मराठा तरुणांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या प्रक्रियेला धक्का बसणार नाही, अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे अजित पवारांनी सांगितले. तर या बैठकीतून मराठा समाजातील तरुणांना काहीही मिळाले नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.


अजित पवार यांनी सांगितले की, राज्य सरकार हे मराठा बांधवांना आरक्षणाचा लाभ देण्यास आणि ते सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यास बांधिल आहे. आरक्षण टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात चांगला वकिल देऊन बाजू मांडण्याची आपली तयारी आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणात मराठी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घेऊनच मुंबईतील मराठा आंदोलकांच्या मागण्यासंदर्भात कार्यवाही झाली पाहिजे, यावर बैठकीत एकमत झाल्याचे पवार यांनी सांगितले आहे.

मात्रा, या बैठकीत एकही प्रस्ताव मान्य करण्यात आला नाही. याउलट मराठा तरुणांना वाऱ्यावर सोडण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतल्याचे दिसून येत आहे. मराठा तरुणांना न्याय देण्याची सरकारची इच्छा नसल्याचे दिसत असल्याचेही माजी मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आंदोलकांची भेट घेतली. अधिवेशन काळात हा प्रश्न उचलून धरण्याचं आश्वासन त्यांनी दिले.