शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव ? चंद्रकांतदादांचं विधान फडणवीसांनी खोडलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत येण्यास तायर आहोत, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या विधानातील हवाच काढली आहे. त्यातून भाजपमधील विसंवादाचेही दर्शन घडले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर शिवसेना-भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, असा कोणताही प्रस्ताव शिवसेनेला आम्ही दिलेला नाही वा शिवसेनेकडून असा काही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेबाबत केलेलं विधान फडणवीस यांनी खोडून काढलं आहे. चंद्रकांत पाटील शिवसेनेबाबत जे बोलले, ते त्यांनी एका प्रश्नाला दिलेलं उत्तर होतं. आम्ही पुढील निवडणुका स्वबळावर लढणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

काल भाजपच्या कार्यकारणीची बैठक घेतली. त्याबद्दलची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. येणाऱ्या काळात स्वबळावर सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार रहावं असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सांगितलं. त्यामध्ये आम्ही यापुढे राज्यात कोणतीही निवडणूक एकत्र लढणार नाही, वेगळी लढणार, निवडणुकीनंतर एकत्र येण्यावर चर्चा होईल. मात्र, अद्याप 4 वर्ष आहेत. यादरम्यान शिवसेनेच्या बाजूनं प्रस्ताव आला तरी निवडणूक वेगळी लढू, प्रस्ताव आल्यास केंद्रीय नेतृत्व विचार करेल. केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिल्यास आम्ही एकत्र येऊ असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.