भाजपचे सोलापूरचे खासदार जयसिध्देश्वर स्वामींच्या अडचणीत ‘प्रचंड’ वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जातीचा दाखला अवैध ठरवून भाजपच्या खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांची खासदारकी धोक्यात आणलेली असून याप्रकरणी त्यांना सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळू शकलेला नाही. फौजदारी कारवाईच्या शक्यतेमुळे त्याला स्थगिती देण्याची विनंती त्यांच्यामार्फत करण्यात आली होती. मात्र ‘याप्रकरणी तहसीलदारांनी आधीच फिर्याद नोंदवलेली असल्यास कारवाईला आडकाठी नसेल’ असे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे आता स्वामींच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत स्वामींनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढविली होती आणि विजय देखील मिळवला होता. विशेष म्हणजे हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. दरम्यान स्वामींनी ही निवडणूक लढवण्यासाठी बेडाजंगम या अनुसूचित जातीचा दाखला सादर करून आपली उमेदवारी निश्चित केली. मात्र मिलिंद मुळे यांनी त्यांचा जातीचा दाखला बनावट असल्याची तक्रार नोंदवली आणि जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्याची छाननी केली. अखेर सुनावणी दरम्यान २४ फेब्रुवारी रोजी स्वामींचा जातीचा दाखला अवैध ठरवून रद्द करण्यात आला. त्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली असून अ‍ॅड. संतोष न्हावकर यांच्यामार्फत तातडीने रिट याचिका दाखल करून उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली आहे.

दरम्यान स्वामींच्या याचिकेवर सोमवारी न्या. के. के. तातेड व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली. या याचिकेवर शुक्रवारी सविस्तर सुनावणी केली जाणार असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे समितीच्या आदेशाप्रमाणे आता फौजदारी कारवाई होऊ शकते, म्हणूनच त्याला अंतरिम स्थगिती देण्याबाबत विनंती स्वामींच्या वकिलांनी केली आहे. मात्र मूळ तक्रारदारांमार्फत अ‍ॅड. गुणरतन सदावर्ते यांनी विरोध केला आहे. दरम्यान खंडपीठाने आपल्या अंतरिम आदेशात स्पष्ट केले आहे की, समितीच्या आदेशाप्रमाणे तहसीलदारांनी आधीच फिर्याद नोंदवली असल्यास कायदेशीर कार्यवाहीला आडकाठी नसेल आणि फिर्याद नोंदवली नसेल तर शुक्रवारपर्यंत नोंदवू नये, त्यामुळे स्वामींच्या अडचणी वाढल्या आहेत.