70 वर्षानंतर देखील रस्ता नाही, स्वातंत्र्य सैनिकास पाठीवरून हॉस्पीटलमध्ये घेऊन जातो मुलगा

घुमारवीं (बिलासपुर) : वृत्तसंस्था – स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही स्वातंत्र्य सैनिकांच्या घरापर्यंत रस्ता पोहोचलेला नाही. घुमारवीं विधानसभा मतदार संघातील करलोटी गावचे रहिवाशी स्वातंत्र्य सैनिक अमरनाथ (९१) यांना आजारी असलेल्या अवस्थेत आजही त्यांचा मुलगा पाठीवर घेऊन २०० मीटरवर असलेल्या रस्त्यापर्यंत जातो.

अमरनाथ यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी जिल्हा प्रशासनापासून राज्य सरकारपर्यंत सर्वांना अनेकदा ही समस्या कळवली आहे. परंतु, आजपर्यंत आश्वासनांशिवाय काहीही मिळालेले नाहीत. एवढेच नव्हे तर जनमंच कार्यक्रमातही रस्त्याच्या प्रश्न मांडला. परंतु, सरकारने काहीही केलेले नाही.

अग्निशामक दलातून सेवानिवृत्त झालेल्या या स्वातंत्र्य सैनिकाचा मोठा मुलगा भूपेंद्र पाल डोगरा यांनी सांगितले की, सरकार विकासाच्या मोठमोठ्या बाता मारते, मात्र, प्रत्यक्षात काही वेगळेच आहे. अनेकवेळा स्थानिक राजकीय नेत्यांनाही साकडे घातले. पण कहीही उपयोग झाला नाही. काँग्रेसचे माजी आमदार राजेश धर्माणी आणि विद्यमान भाजपा आमदार राजेंद्र गर्ग यांनाही २०० मीटर रस्ता बनविण्याची विनंती केली, पण आश्वासनच मिळाले.

अमरनाथ यांना आरोग्य तपासणीसाठी रूग्णालयात घेऊन जात असलेल्या त्यांचा मुलगा राजकुमारने सांगितले की, रस्ता नसल्याने रात्रीच्यावेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याबाबत आमदार राजेंद्र गर्ग यांना विचारले असता त्यांनी हे प्रकरण माझ्या लक्षात आहे, असे म्हटले. २०० मीटरचा रस्ता तयार करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. पाच लाखांचा निधीही मिळाला आहे, असे म्हटले. तर ग्रामपंचायत प्रमुखाने सांगितले की, या कुटुंबाला रस्ता मिळणे गरजेचे आहे. तर विलासपुरचे उपायुक्त राजेश्वर गोयल यांनी रस्ता लवकरत मार्गी लावला जाईल असे सांगितले. दरम्यान, जर रस्त्याचे काम लवकर सुरू झाले नाही तर पत्नीसोबत धरणे आंदोलन करेन, असा इशारा अमरनाथ यांनी दिला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/