आमदार रोहित पवारांचा ‘लोकल’ प्रवास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांची जीवनशैली अत्यंत साधी आहे. आतापर्यंत घडलेल्या घटनांमध्ये हे समोर आलेले आहे. आपल्या सहकाऱ्यांशी ते नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणेच वागतात, अनेकदा सोशल मीडियातून ते आपलं साधारण वागणं कार्यकर्त्यांसाठी शेअर करत असतात. मग, एखाद्या आजीच्या घरी जाऊन जेवण करणं असेल किंवा सहजच एखाद्या दुकानात जाऊन खेळणी खरेदी करणं असेल. आता पुन्हा एकदा लोकल प्रवासाने रोहित पवारांनी कार्यकर्त्यांची मने जिंकली आहेत. त्यांनी लोकल प्रवासाचे फोटो ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहेत.

हे फोटो शेअर करताना त्यांनी फोटो ओळही लिहिली आहे. त्यामध्ये ते म्हणतात, मुंबईत कॉलेजला असताना अनेकदा लोकलनं प्रवास करायचो. काल बऱ्याच दिवसांनी एका कामानिमित्त अंधेरी ते मीरा रोडदरम्यान लोकलनं प्रवास करण्याचा योग आला आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कोरोनाच्या संकटावर मात करून आपल्या मुंबईची ही लाइफलाइन लवकरच पूर्ववत होईल अशी आशा करतो, असे म्हटले आहे.

विशेष म्हणजे यापूर्वीही रोहित पवार यांनी मुंबईतील डबेवाल्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत लोकलने प्रवास केला होता. त्यावेळी मी एक दिवस त्यांच्यातला डबेवाला बनल्याचं सांगताना, डबेवाल्यांसोबतच्या एक दिवसाचा अनुभव रोहित यांनी शेअर केला होता.

कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाउनची घोषणा करण्यापूर्वीपासून मुंबईतील लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने लोकलसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, अद्यापही सर्वसामान्य नागरिकांना लोकल सेवेचा लाभ घेता येत नाही. त्यातच, लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी पूर्वीप्रमाणे सुरू व्हावी, अशी आशा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.