देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का, विरोधीपक्ष नेत्याची निवड लांबणीवर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आल्यानंतर विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीची घोषणा करण्यात येणार होती. मात्र आज विरोधी पक्षनेत्याची निवड कामकाजातून वगळण्यात आली आहे. त्यामुळे विरोधीपक्ष नेत्याची निवड लांबणीवर पडली आहे. हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षनेतेपदापासून दूर ठेवण्याची रणनीती आता महाविकास आघाडीकडून आखली गेल्याचं चित्र आहे. नागपूरमध्ये येत्या 16 डिसेंबर रोजी सुरु होत असलेल्या हिवाळी अधिवेशनातच आता विरोधीपक्ष नेता निवडला जाणार आहे. त्यानंतरच देवेंद्र फडणवीस यांना विरोधीपक्ष नेतेपदाचे अधिकार मिळतील.

महाविकास आघाडीच्या सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव-
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुमताच्या परीक्षेला सामोरे जाण्याआधीच राजीनामा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडीनं सत्तास्थापनेचा दावा केला. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. राज्यपालांच्या सूचनेनुसार बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे.

त्यानुसार शनिवारी सभागृहाचे काम सुरू होताच हंगामी अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची घोषणा झाली. कामकाज सुरू होताच विधिमंडळाचे भाजप गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी हरकतीचा मुद्दा मांडत मुख्यमंत्री तसेच इतर मंत्र्यांचा शपथविधी, हंगामी अध्यक्ष बदलणे हे नियमबाह्य असल्याचा आक्षेप नोंदवला. तसेच विश्वासदर्शक ठरावाची चाचणी सभागृहात सुरु असताना भाजपाच्या आमदारांनी सभात्याग केला. सरकारला 169 आमदारांनी समर्थन दिले, तर 4 आमदार तटस्थ राहिले. त्यामुळं हा ठराव उद्धव ठाकरे सरकारनं 169 विरुद्ध 0 मतांनी जिंकला.

Visit : Policenama.com