जालन्याच्या जागेचा तिडा सुटता सुटेना, मातोश्रीवरील बैठकीतही तोडगा नाही

उद्या औरंगाबादेत पुन्हा बैठक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिवसेना भाजपा एक झाली असली तरी, जालन्यात शिवसेना- भाजपा एक झालेले दिसत नाहीये. भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वाद अद्यापही मिटलेला नाही. जालन्याच्या लोकसभा उमेदवारीबाबत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत महिला आणि बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक पार पडली, मात्र जालन्याच्या उमेदवारीबाबत या बैठकीतही तोडगा निघाला नसल्याचे समोर आले आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे, सर्वग पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र शिवसेना – भाजपाने एकही यादी जाहीर केली नाही. परंतु जालन्याच्या लोकसभेच्या जागेवरून अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वाद संपलेला दिसत नाही. हाच वाद मिटवण्यासाठी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत महिला आणि बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक पार पडली. मराठवाड्यातील युतीच्या समन्वयकाची जबाबदारी पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता खोतकर-दानवे वाद मिटवण्यासाठी पंकजा मुंडे समन्वयकाच्या भूमिकेत असल्याचे बोलले जात आहे.आजच्या बैठकीत जालन्यातील जागेवर अंतिम तोडगा निघणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अद्यापही तोडगा निघाला नसल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे, शिवसेना भाजप युतीचा दुसरा मेळावा उद्या औरंगाबादमध्ये पार पडणार आहे. त्याआधी रामा हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक होणार आहे. यामध्ये जालन्याच्या जागेवर तोडगा निघणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.

इतकेच नव्हे तर, आजच्या बैठकीत मी उद्धव ठाकरेंसमोर प्रस्ताव ठेवले आहेत. जालन्यात एक तर मैत्रीपूर्ण लढत व्हावी किंवा जालना शिवसेनेला सुटावी. जालन्याची जागा शिवसेना निश्चित जिंकून येईल, हा विश्वास मला आहे आणि हे मी उद्धव ठाकरेंना पटवून दिले आहे. पंकजा मुंडे समन्वयक म्हणून आज बैठकीला आल्या होत्या. काँग्रेसमध्ये जाण्याबाबत अजून निर्णय नाही. उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल असे अर्जुन खोतकर यांनी म्हंटले आहे.