उकाड्यात ‘कोरोना’ संक्रमणाचा ‘वेग’ मंदावतो ?, ‘या’ राज्यातील आकडेवारीवरून मिळालं ‘उत्तर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 1 लाख 20 हजाराच्या आसपास पोहचला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. फेब्रुवारीपासून देशात कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागल्यानंतर चार महिन्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या लाखाच्यावर गेली. त्यावेळी उकाडा वाढल्यावर कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा वेग मंदावेल, असा दावा करण्यात आला होता. उकाड्यात कोरोना विषाणू फारकाळ जिवंत राहणार नाही. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यावर कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल असं म्हटल होत. मात्र, दिल्लीतील आकडेवारीवरून हा दावा फेल ठरताना दिसत आहे.

देशाची राजधानी दिल्लीत सध्याचे तापमान 40 अंश सेल्सिअसर्पंयत पोहोचलं आहे. मात्र, सलग चौथ्या दिवशी कोरोनाचे पाचशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहे. आज तर दिल्लीत कोरोनाचे 600 हून अधिक रुग्ण सापडले आहेत. उष्णता वाढल्यानंतर कोरोनाचा विषाणू जिवंत राहू शकत नाही, हा दावा आता दिल्लीतील आकडेवारीवरून पूर्णपणे फोल ठरला आहे. गुरुवारी दिल्लीतील तापमान 44 अंश सेल्लिअस होते. यंदाच्या हंगामातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद होऊनही गेल्या 24 तासांत कोरोनाचे 600 रुग्ण आढळून आले आहेत.

राजधानी दिल्लीत एप्रिलपर्यंत कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग तुलनेत कमी होता. मात्र, मे महिना सुरु होताच कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा वेग वाढला. मे मिहिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दर दिवशी कोरोनाचे सरासरी 300 रुग्ण सापडत आहेत. त्यानंतर हाच आकडा 400च्या वर पोहचला. त्यानंतर आता मागील तीन दिवसात कोरोनाचे 500 रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 12 हजाराच्यावर गेला आहे.