भारतात पेट्रोल, डिझेल दराचा भडका उडणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने इराणकडून खनिज तेलाची खरेदी थांबवल्यानंतरही अमेरेकडून भारताला दिलासा मिळाला नाही. अमेरिकेने हात वर केल्यामुळे इंधनाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. इराणसोबतचा तेल व्यापार थांबवल्यामुळे होणाऱ्या नुकसान भरपाई म्हणून अमेरिकेने कमी दराने खनिज तेलाची विक्री करावी अशी भारताने विनंती केली आहे. मात्र याबाबत अमेरिकेने कोणतेही ठोस अश्वासन देण्यास नकार दिला आहे.

अमेरिकेतील खनिज तेलाचे क्षेत्र खासगी कंपन्यांकडे असल्याने त्यांना आम्ही कमी दरात तेल पुरवठा करण्यास सांगू शकत नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. नोव्हेंबरमध्ये इराणवर बहिष्कार घातल्यानंतर या देशासोबत जो व्यापार करेल त्या देशावरही बहिष्कार घालण्याची धमकी अमेरिकेने दिली होती. असे असतानाही अमेरिकेने भारतासह इतर काही देशांना सहा महिन्यांची मुदत दिली होती. आता ती मुदत संपली आहे. त्यामुळे भारताला इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागण्याची शक्यता आहे.

भारतासाठी इराणसोबतचा तेल व्यापार फायद्याचा होता. इराणकडून तेल खरेदी केल्यानंतर त्याचे बील चुकते करण्यासाठी ६० दिवसांची मुदत देण्यात येत होती. मात्र, सौदी अरेबीया, कुवेत, इराक, नायजेरिया अमेरिका यांच्याकडून अशी मुदत देण्यात येत नव्हती. भारताने इराणकडून होणारा तेल व्यापार बंद केल्याने बाजारात तेलाची कमतरता जणवण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी सौदी अरेबियासोबत अन्य तेल पुरवठा करणाऱ्या देशांसोबत चर्चा सुरू असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. बाजारातील तेलाचा पुरवठा सुरळीत ठेवला जाईल असेही अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे.