अहमदनगरमध्ये ‘महाविकास’चं ‘शक्तीमान’, ‘विखे पॅटर्न’ दिसलाच नाही

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूका झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करून सत्ता स्थापन केली. आता महाराष्ट्रात सगळीकडे महाविकास आघाडीचे वारे वाहू लागले आहेत. अनेक जिल्हा परिषदेच्या निवडणूका
राज्यातील महाविकास आघाडीने एकत्र लढवण्याचे ठरवले आहे. त्यापैकी अहमदनगरमधील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतही महाविकास आघाडी एकत्र दिसली आहे. अहमदनगर जिल्हापरिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या प्रताप शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे समोर आले.

राज्यात प्रथमच अहमदनगरमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद महाविकास आघाडीकडे गेले आहे. या निवडणुकीत भाजपने माघार घेतली आहे कारण भाजपाकडे पुरेशा संख्याबळाचा अभाव होता. विशेष म्हणजे अहमदनगरमध्ये ‘विखे पॅटर्न’ चालला नाही. नगरच्या राजकारणात राधाकृष्ण विखे पाटील यांचे नेहमीच वर्चस्व पहायला मिळत असते, त्यामुळे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या विखे पाटील यांच्या जोरावर भाजप निवडणूक जिंकेल असे वाटत होते. परंतु भाजपने माघार घेतल्याने ‘विखे पॅटर्न’ नगरमध्ये दिसलाच नाही.

नगरमध्ये भाजपकडून अध्यक्षपदासाठी सुनीता खेडकर आणि उपाध्यक्षपदासाठी संध्या आठरे हे मैदानात होते तर राष्ट्रवादीकडून राजश्री घुले आणि काँग्रेसकडून प्रताप शेळके हे मैदानात होते. परंतु माजी मंत्री प्रा. राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी खेडकर आणि आठरे यांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं. त्यामुळे घुले आणि शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणूक सभेत भाजपच्या अनेक सदस्यांची अनुपस्थिती दिसली. या सभेदरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे पाटील यांनी सांगितले की मी अजूनही काँग्रेसमध्येच आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. शालिनी विखे या सलग पाच वर्षे अध्यक्ष पद भूषविले आहे. या दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वांशी हस्तांदोलन केले. सभेला एकूण ६७ सदस्य उपस्थित होते. तसेच राजश्री घुले आणि शेळके यांनी सर्वांचे आभार देखील मानले. आघाडी झाल्यामुळे जिल्हापरिषदेला चांगला निधी मिळेल, असा विश्वास नवीन अध्यक्ष राजश्री घुले यांनी व्यक्त केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/