पुण्यात पाणी कपातीचा निर्णय नाही, परंतु आठवडयातून एक दिवस पाणीपुरवठा बंद : महापौर मुक्‍ता टिळक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – धरणात आता शेती आणि पिण्यापुरते पाणी असल्याने सध्यातरी शहरातील पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, देशभाल-दुस्तीसाठी आठवडयातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहील आणि पाण्याच्या नियोजनाबाबत महापालिका आणि पाटबंधारे खात्यातील अधिकार्‍यांची बैठक होणार असल्याची माहिती महौपार मुक्‍ता टिळक यांनी दिली आहे.

पुण्यात पाण्याचा प्रश्‍न अगदी ऐरणीवर आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पुण्यात पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र, धरणाची सद्यास्थिती पाहता पाणी कपात होणार असे दृश्य गेल्या काही दिवसांपासुन निर्माण झाले होते. निवडणुकीच्या दरम्यान पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना देखील मतदारांनी पाणी प्रश्‍नावर अनेक प्रश्‍न विचारले होते. सध्या धरणात शेती आणि पिण्यापुरते पाणी असल्याने शहरातील पाणी कपात सध्यातरी लांबणीवर पडली आहे. मात्र, आठवडयातुन एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या महापौर मुक्‍ता टिळक यांनी दिली आहे.