‘त्या’ मारहाण प्रकरणानंतर केईएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा संप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – परळीमधील केईएम रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याच्या प्रकारानंतर केईएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यात आरोपींना अटक करेपर्यंत काम बंद ठेवण्याची भूमिका कर्मचारी संघटनांनी घेतली आहे.

काय आहे प्रकरण ?
शुक्रवारी केईम रुग्णालयातील वॉर्ड नंबर ३३ मधील ऑपरेशन थिएटर मधील कर्मचाऱ्याला रुग्णाच्या नातेवाईकाने क्षुल्लक कारणावरून मारहाण केली होती. त्यानिषेधार्थ रुग्णालयातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन काम बंद आंदोलन सुरू केले आहे. केईम रुग्णालयात दरदिवशी येणाऱ्या रुग्णांची संख्या आणि त्याला अनुसरून उपलब्ध अपुरे मनुष्यबळ याबद्दल नेहमीच तक्रार करूनसुद्धा दुर्लक्ष केले जात असल्याने कामगारांमध्ये नेहमीच असंतोष राहिला आहे. अशातच गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात कर्मचाऱ्याला होणाऱ्या मारहाणीचा प्रकार घडत असल्याने आज कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.

अन्यथा काम बंद…
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या डीन कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना वारंवार घडत आहेत. त्याला आळा घालण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. तसेच दोषींना तत्काळ अटक करून गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

रुग्णालय कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे रुग्णालयातील सेवेवर परिणाम होणार असून रुग्णांच्या आरोग्याविषयी गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. रुग्णालय प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून या घटनांना आळा घालण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.