७२ हजार देण्याची कल्पना राहुल गांधींची नव्हे तर ‘या’ दोघांची डोक्यालिटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी मोठी घोषणा केली. देशातल्या प्रत्येक गरिबाला ७२ हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. मात्र या घोषणेमागची खरी कल्पना कोणी दिली ? याबाबतची चर्चा सध्या देशभर सुरु आहे. आता याबाबतचा खुलासा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. ७२ हजार देण्याच्या ‘किमान उत्पन्नाची हमी’ या कल्पनेमागे ब्रिटिश आणि फ्रेंच अर्थतज्ज्ञ असल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, एका इंग्रजी वृत्तपत्राने ७२ हजार देण्याच्या घोषणेमागे नेमकी कुणाची कल्पना आहे. याबाबत काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून माहिती मिळवली आहे. खरंतर ही कल्पना 2015चे नोबल पुरस्कार विजेता ब्रिटिश अर्थतज्ञ एंगस डीटन आणि फ्रेंच अर्थतज्ञ थॉमस पिकेटी यांची असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पुस्तकाच्या माध्यमातून राहुल अर्थतज्ञांपर्यंत

पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही अर्थतज्ञांनी दिलेल्या कल्पनेनुसार राहुल गांधी यांनी ही योजना आखली आहे. एका पुस्तकाच्या माध्यमातून राहुल गांधी फ्रेंच अर्थतज्ञांना भेटले. अर्थतज्ञ थॉमस पिकेटी यांनी Capital in the Twenty-First Century या नावाचं पुस्तक लिहलं आहे. त्याच्या माध्यमातून काँग्रेसने त्यांचा शोध घेतला. या योजनेवर काम करण्यासाठी राहुल गांधी यांनी अनेक लोकांना या कामी लावलं आहे. त्याचवेळी त्यांना पिकेटी यांचं पुस्तक मिळालं आणि ते त्यांच्यापर्यंत पोहचले.

दरम्यान, या योजनेवर काम करण्यासाठी खूप दिवस मेहनत घेण्यात आली आहे. त्यासाठी अनेक दिग्गजांशी बोलणं करण्यात आलं. त्यांची मतं घेऊन त्यावर अधिक रिसर्च करून त्यानंतर ही योजना आखण्यात आली आहे. निवडणुका आल्यामुळे मतांच्या पेट्या भरण्यासाठी ही योजना आखण्यात आलेली नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.