रथयात्रा रोखणाऱ्यांना रथाखाली चिरडू टाकू

पश्चिम बंगाल : वृत्तसंस्था- भाजपाच्या पश्चिम बंगालच्या एका महिला नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जे लोक पश्चिम बंगालमधील नियोजित रथयात्रा रोखण्याचा प्रयत्न करतील त्यांना रथाच्या चाकाखाली चिरडून टाकू अशी धमकीच राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्ष लॉकेट चॅटर्जी यांनी दिली आहे. ही रथयात्रा राज्यात लोकशाही स्थापन करण्याच्या उद्देशाने आयोजित केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. मालदा जिल्ह्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, भाजपा अध्यक्ष अमित शाह हे या तीन रथयात्रांची सुरुवात करणार आहेत. राज्यातील सर्व ४२ लोकसभा मतदारसंघात जाणारी ही रथयात्रा ५, ७ आणि ९ डिसेंबरला निघेल. यात्रेच्या समाप्तीनंतर पक्षाची कोलकाता येथे एक सभा होणार असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.

चॅटर्जी म्हणाल्या, रथ यात्रेचा मुख्य उद्देश हा पश्चिम बंगालमध्ये लोकशाही बहाल करणे. आम्ही यापूर्वीही म्हटले आहे की, रथ यात्रा रोखणाऱ्यांचे शिर रथाच्या चाकाखाली चिरडून काढू.

चॅटर्जी यांच्या वक्तव्याचा सत्तारुढ तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांनी निषेध केला आहे. भाजपा नेते प्रक्षोभक वक्तव्ये करत राज्यातील शांतता आणि स्थिरता भंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. बंगालमध्ये आपले धार्मिक धोरण पुढे रेटण्याचा भाजपाचा मुख्य उद्देश आहे. परंतु, बंगालमधील लोक भाजपाचे फुटीरवादी राजकारण यशस्वी होऊ देणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.