कुणाचाही पगार कपात केला जाणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन

मुंबई : पोलीसनामा ऑनालाइन – लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केला जाणार असल्याची चर्चा आज दिवसभर सुरु होती. मात्र अशा प्रकारे कोणतीही कपात केली जाणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. आज सकाळपासून अनेकांचे फोन आले. कित्येकांनी काळजी व्यक्त केली. मात्र सरकार कोणाचंही वेतन कापणार नाही. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन आलेल्या आर्थिक अडचणी पाहता लोकप्रतिनिधी आणि शासकिय कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने पगार दिला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला.

जसजसे दिवस जात आहेत तसे आपण आपली पकडही मजबूत करत आहोत. हाच तो काळ आहे ज्या काळात कोरोनाचा विषाणू गुणाकार सुरु करतो. आपण सगळे त्याला धैर्याने तोंड देत आहोत ही कौतुकाची बाब आहे. आपली लढाई अजून संपलेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी आज जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कोणाचाही पगार कापला जाणार नाही अशी ग्वाही दिली.

यामुळे टप्प्याटप्याने वेतन देणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मी परवा नायडू रुग्णालयातील डॉक्टरांशी बोललो. त्यांना जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला ते एखाद्या सैनिकासारखे वाटले. कोरोना नावाच्या व्हायरसशी हे सगळे लढत आहेत. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अशावेळी कोरोनाने कितीही टकरा दिल्या तरी त्याचा पराभव होणारच हे लक्षात असू द्या. तसंच कोरोनाशी लढण्यासाठी इतके हात पुढे येत आहेत. मग कुणाचाही पगार कसा काय कापला जाईल ? कोरोनाशी लढल्यानंतर आर्थिक संकट येणार आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने हा पगार दिला जाईल असं आश्वासन मी देतो, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

थंड पाणी, सरबत न पिण्याचे आवाहन
सद्या उन्हाळा सुरु आहे, त्यामुळे थंड पाणी किंवा सरबत पिणं अगदी घराघरात होत असतं. मात्र, शक्यतो ते टाळा, सरबत पिऊ नका. थंड पाण्याची बाटली तोंडाला लावू नका. हे कोरोनाचा उपाय म्हणून मी सांगत आहे. मात्र यामुळे सर्दी किंवा खोकला झाला तर चिंता वाढू शकते. घरात एसी असेल तर तो देखील लावू नका. त्यापेक्षा दारं खिडक्या उघडा, मोकळी हवा घरात येऊ द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोरोनाच्या निर्णायक टप्प्याकडे जात आहोत

आपण कोरोनाविरुद्धच्या लढाईत अखेरच्या आणि निर्णायक टप्प्याकडे जात आहोत. त्यामुळे वस्त्या, इमारती सील कराव्या लगात आहेत. एखाद्या भागातला संसर्ग दुसरीकडे पोहचू नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सुरुवातीला केंद्र सरकारनं काही देशांचा समावेश कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत केला नव्हता. त्यामुळे अशा देशांतून आलेल्या व्यक्तींची विमानतळावर तपासणी होऊ शकली नाही. परदेशातून आलेल्या, मात्र, तपासणी न झालेल्या अशा व्यक्तींनी पुढं यावं आणि स्वत:ची माहिती द्यावी आणि तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.