देशातील ‘ही’ युनिव्हर्सिटी देणार ‘कोरोना’ योद्ध्यांच्या मुलांना ‘स्कॉलरशीप’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. देशात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. कोरोना काळात कोविड योद्धा बनून काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलांना नोएडा युनिव्हर्सिटीकडून स्कॉलरशीप देण्यात येणार आहे. ग्रोटर नोएडा येथील नोएडा युनिव्हर्सिटीने कोरोना योद्ध्यांच्या समर्थनार्थ ही घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक आणि नोएडा युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू डॉ. विक्रम सिंह यांनी आज (गुरुवार) याबाबतची घोषणा केली आहे.

यांच्या मुलांना मिळणार स्कॉलरशिप
कुलगुरू डॉ. विक्रम सिंह यांनी सांगितले की, कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या पोलीस, डॉक्टर, वैद्यकीय स्टाफ, पत्रकार आणि सफाई कामगारांच्या पाल्यांना ही स्कॉलरशीप देण्यात येणार आहे. कोरोना योद्ध्यांच्या मुलांनी येथील विद्यापीठात प्रवेश घेतल्यास, त्यांना फी मध्ये 20 टक्के सवलत मिळणार आहे. या स्कॉलरशीपमध्ये ट्युशन फी, बोर्डिंग फी आणि इतर दुसरे शुल्क असणार आहे.

तरच मिळेल स्कॉलरशीप
ही स्कॉलरशीप चालू शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात येणार आहे. जोपर्यंत पाल्य या विद्यापीठात शिक्षण घेईल, तोपर्यंत या स्कॉलरशीपचा लाभ घेता येणार आहे. मात्र, त्यासाठी प्रत्येक सेमिस्टरमध्ये पाडल्यास 60 टक्के गुण घ्यावे लागणार आहेत. नोएडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी हे एक खासगी विश्वविद्यालय आहे.