राम मंदिर ट्रस्ट संदर्भात शिवसेनेची PM मोदींकडे ‘ही’ मोठी मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 7 मार्चला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यापूर्वी शिवसेनेकडून मागणी करण्यात आली आहे की शिवसेनेच्या किमान एका तरी सदस्याला अयोध्या राम मंदिराच्या न्यासामध्ये (ट्रस्ट) नियुक्त करण्यात यावे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ही मागणी केली आहे. यासंबंधित पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले आहे. यात मागणी करण्यात आली आहे की राम मंदिरासाठी केलेल्या आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे योगदान पाहता, राम मंदिराच्या ट्रस्टवर शिवसेनेच्या किमान एका सदस्याची नियुक्ती करण्यात यावी.

अयोध्येतील रामजन्मभूमीच्या खटल्यावर निकाल आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती परंतु 24 नोव्हेंबर 2019 ला आयोजित दौरा लांबणीवर पडला होता, त्यानंतर आता ते 7 मार्चला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आयोद्या दौरा निश्चित करण्यात आल्यानंतर अखिल भारत हिंदू महासभेने शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येण्यास विरोध दर्शवला आहे. महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र कुमार द्विवेदी यांनी सांगितले की पहिल्यांदा मंदिर आणि नंतर सरकारचा नारा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी श्रीरामाचे अस्तित्व नाकारण्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात देणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यानंतर आता अयोध्येत येण्याचा नैतिक अधिकारी त्यांना नाही, त्यांनी तो गमावला आहे.