पोलिसांकडून घराची झडती, माजी आ. गडाख सापडले नाही

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – माजी आमदार शंकरराव गडाख यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट न्यायालयाने काढल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांचा फौजफाटा नगर येथील निवासस्थानी दाखल झाला होता. गडाख यांच्या नगर शहरातील घराची झडती पोलिसांनी घेतली मात्र, घरात माजी आ. शंकराव गडाख सापडले नाहीत. ते पुण्याला गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. ते न्यायालयात स्वत:हून हजर होतात की पोलिस त्यांना अटक करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नगर-औरंगाबाद रस्त्यावर चक्काजाम आंदोलन प्रकरणात शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात माजी आमदार शंकराव गडाख, अशोक गायकवाड आदी कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयीन कामकाजासाठी सदर खटल्याचे कामकाज नेवासा येथील न्यायालयासमोर सुरू आहे. न्यायालयाने समन्स वॉरंट जारी करूनही माजी आमदार गडाख हे हजर राहिले नाही. त्यामुळे माजी आमदार शंकरराव यांच्याविरुद्ध नेवासा येथील न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे. शनिवारी आमदार गडाख यांना न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या आदेशानुसार पोलिसांचा मोठा फौजफाटा आज सकाळी गडाख यांच्या सावेडी उपनगरातील निवासस्थानी दाखल झाला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह इतरही पोलिस फौजफाटा गडाख यांच्या निवासस्थानी दाखल झाले होता. पोलिसांनी शंकरराव गडाख यांच्या घराची झडती घेतली. मात्र घरात माजी आमदार शंकराव गडाख आढळून आले नाहीत. घरात माजी खासदार यशवंतराव गडाख, प्रशांत गडाख व घरातील इतर महिला व मुले होती. सोनई येथील गडाख यांच्या निवासस्थानीही मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र तिथेही गडाख आढळून आले नाहीत. त्यामुळे माजी आमदार शंकराव गडाख मिळून आले नाहीत, असा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला आहे. गडाख यांच्या नगर व सोनई येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रशांत गडाख यांनी राजकीय विरोधकांनी प्रशासनावर दबाव आणून गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात आहे, असा आरोप केला आहे. माजी आमदार शंकराव गडाख पुण्याला गेल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. त्यांना नेमकी कधी अटक होणार, यावर चर्चा सुरू झाली आहे.

You might also like