Lockdown 3.0 : मुंबईतील दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दारु खरेदीसाठी लोकांची होणारी गर्दी, त्यातून लॉकडाऊनच्या नियमांचे होणारे उल्लंघन लक्षात घेता मुंबई महापालिकेने लॉकडाऊनध्ये दिलेली शिथिलता आज (मंगळवार) अखेर रद्द केली आहे. लॉकडाऊनच्या नियम शिथिल कर देण्यात आलेल्या मुंबईतील सर्व सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईत बुधवारपासून (दि.6) पूर्वीप्रमाणे अत्यावश्यक सेवाच फक्त सुरु राहतील असे आदेश आयुक्तांनी जारी केले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद राहणार आहेत.


4 मेपासून लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने शिथिलता दिली होती. त्यानुसार अत्यावश्यक सेवेच्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकानं सुरु करण्याची परवानगी सरकारने दिली होती. दारूच्या दुकानांनाही परवानगी देण्यात आली होती. मात्र, दारू खरेदी करण्यासाठी मुंबईत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं दोन दिवस पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी तर काही किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या.
मद्यप्रेमींकडून रांगेत कोणत्याही नियमांचे पालन होत नव्हतं. दारू खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये हाणामारी झाल्याचे पहायला मिळाले. दारुची दुकानं सुरु करताना दुकानासमोर एका वेळी पाच ग्राहक उभे राहतील अशी अट घालण्यात आली होती. तर प्रत्येक ग्राहकामध्ये साह फुटांचे अंतर ठेवण्याची अट ठेवण्यात आली होती. मात्र, अनेक दुकानांसमोर ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन कुठेही झालेले नसल्याने यातून कोरोनाचा फैलाव होण्याची भीती होती. त्यामुळे मुंबई महापालिकेने लॉकडाऊनची शिथिलता अखेर आज रद्द केली.