राज्यातील 4000 शाळेतील 40000 शिक्षकांचा 10-12 वीचे पेपर तपासणीवर ‘बहिष्कार’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – मागील अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या मागण्यासाठी राज्यातील 4 हजार शाळेमधील शिक्षकांनी 10-12 वीचे पेपर तपासणीवर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी दहावी बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या संदर्भात आज महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शिक्षक संघटनेच्या वतीने बहिष्काराचा इशारा दिला आहे. ते पत्रक देखील काढण्यात आले असून त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

मागील अनेक वर्षापासून कायम आणि विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्या प्रलंबीत आहेत. प्रलंबीत मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी 40 हजार शिक्षकांनी 10-12 वीचे पेपर तपासण्यावर बहिष्कार टाकत आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिक्षकांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे राज्य सरकार शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

बारीवीची परीक्षा 18 फेब्रुवारी पासून सुरु झाली आहे. या परीक्षेला राज्यातील 12 लाख 5 हजार 27 विविध विषयांचे विद्यार्थी परिक्षा देत आहेत. विज्ञान, कला, वाणिज्य आणि एमसीव्हीसी विभागाचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. त्यापैकी 3 लाख 39 हजार विद्यार्थी हे मुंबईसह उपनगरांमधील आहेत. पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत परीक्षा घेण्यात येत आहे. त्यासाठी 500 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जात आहे.
या आहेत शिक्षकांच्या मागण्या
1. 40 टक्के अनुदान निधी तात्काळ उपलब्ध करुन द्यावा
2. विनाअनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण देण्यात यावे
3. चलीत नियमानुसार अनुदानाचा टप्पा देण्यात यावा
4.अघोषीत शाळांना तात्काळ निधीसह अनुदान घोषित करण्यात यावे