Lockdown : ‘रेशन’ कार्ड नसणार्‍या 10 लाख लोकांना आजपासून ‘फ्री’मध्ये मिळणार रेशन, जाणून घ्या कसं ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचा धोका वाढल्यामुळे २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू आहे. त्यामुळे गरिबांना आणि मजुरांना अडचण होत आहे. सामान्य लोकांची अडचण दूर करण्यासाठी दिल्ली सरकार आजपासून रेशनकार्ड नसलेल्यांना देखील मोफत रेशन उपलब्ध करत आहे. यामुळे १० लाख लोकांना मोफत रेशन मिळेल, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही.

मोफत रेशन देण्यासाठी ४२१ शाळांमध्ये व्यवस्था केली गेली आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा प्रत्येक व्यक्तीला ५-५ किलो रेशन मोफत मिळेल. आता १० लाख लोकांसाठी रेशनची व्यवस्था केली गेली आहे. दिल्ली सरकारनुसार, जर गरज पडली तर आणखी रेशनची व्यवस्था केली जाईल.

विना रेशन कार्ड असे मिळणार रेशन
ज्या लोकांनी रेशन कार्ड बनवण्यासाठी अर्ज केला आहे पण अद्याप त्यांचे कार्ड बनलेले नाही, अशा लोकांसाठी दिल्ली सरकारच्या वेबसाइटवर एक फॉर्म आहे. तुम्ही या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करू शकता. सरकारने म्हटले की, नोंदणीची गरज यासाठी आहे कारण विना नोंदणी रेशन वाटले तर एकच व्यक्ती अनेक वेळा येऊन रेशन घेऊन जाऊ शकते.

ज्या लोकांना रेशन मिळाले आहे त्यांना रोखण्यासाठी नोंदणी आवश्यक केली जात आहे. दिल्ली सरकारने आवाहन केले आहे की, रेशन कार्ड नसलेले लोकं या वेबसाइटवर जाऊन फॉर्म स्वतः भरू शकतात. याशिवाय जे सुशिक्षित आहेत त्यांनी आपल्या जवळपास असलेल्या गरीब लोकांचा फॉर्म भरून द्यावा. आशा आहे की, बुधवार किंवा गुरुवारपासून तुम्हाला रेशन मिळणे सुरु होईल. प्रत्येक व्यक्तीला ५-५ किलो रेशन मोफत दिले जाईल.

सातही दिवस वाटले जाणार रेशन
लॉकडाऊन स्थितीत दिल्ली सरकारने दिल्लीतील लोकांना मोठा दिलासा दिला आहे. सर्व सरकारी रेशन दुकानांवर सात दिवस रेशन वाटप करण्याचे सरकारने जाहीर केले आहे. अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि दिल्ली राज्य नागरी पुरवठा महामंडळाने एप्रिल २०२० मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यातील लाभार्थ्यांना ५० टक्के अधिक रेशन मोफत देण्यासाठी केलेल्या तयारीचा देखील सरकारने आढावा घेतला आहे.

खासदार आणि आमदारांना लावली ड्युटी
सर्व गरजूंना रेशन मिळू शकेल आणि रेशन वाटपादरम्यान सोशल डिस्टंसिंग राखण्यासाठी दिल्ली सरकारने रेशन वितरण केंद्रांवर आमदार, खासदार, समुपदेशक इ.ना ड्युटी लावली आहे.