यामुळे अनिवासी भारतीयांना फडकावा लागला चिनी तिरंगा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

आज देशभरात ७२ वा स्वातंत्र्यदिन आनंद आणि उत्साहा साजरा करण्यात येत आहे. त्याचबरोबर परदेशातही तो मोठ्या प्रमाणात साजरा करावा लागतो. पण यंदा अनिवासी भारतीयांना मात्र चिनी बनावटीचा तिरंगा फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागला आहे. भारतीय बनावटीचे झेंडे निर्यात करण्यास आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी नकार दिल्याने भारतीय बनावटीचा एकही तिरंगा परदेशात रवाना झाला नाही.

[amazon_link asins=’B01LXDUDDQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’aba156ea-a052-11e8-9765-bf20eb45190e’]

दरवर्षी मोठ्या प्रमाणात भारतात बनलेले झेंडे जगभरात निर्यात केले जातात. खूप मोठ्या प्रमाणात झेंड्यांच्या आॅर्डरही जगभरातून भारतीय व्यापाऱ्यांकडे आल्या आहेत. पण हे तिरंगे निर्यात करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. या नकाराचे कारण ही या कंपन्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यांच्या मते झेंडे निर्यात करण्यावर अनेक निर्बंध असल्यामुळे या कंपन्या झेंड्यांचे कन्साइनमेंट घेत नाहीत. तिरंग्याविषयी भारतीयांच्या भावना अतिशय तीव्र आहे. निर्यातीच्या दरम्यान या तिरंग्याची वाहतूक करताना काही प्रश्न निर्माण झाला तर तिरंग्याचा अपमान केला असा गजहब होऊ शकतो. त्यातून कंपनीवर गुन्हा दाखल होण्याबरोबरच कंपनीची बदनामीही होऊ शकते, हे लक्षात घेऊन कंपन्या तिरंगा निर्यात करण्यास नकार देत असाव्यात.

भारत सरकारने यावर कुठलेच निर्बंध घातलेले नाहीत. पण निर्यात करताना त्या झेंड्यांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी अशी सरकारची भूमिका आहे.

भारतीय बनावटीचे तिरंगे विदेशात पोहोचत नसल्यामुळे तेथील बाजारपेठांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या चिनी बनावटीचे झेंडे फडकवूनच अनिवासी भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत. पण यावर्षी भारतीय बाजारपेठेत मात्र झेंड्यांचा खप मोठ्या प्रमाणात वाढला आहे.