‘त्या’ काॅफी शाॅप मधील ‘भानगडी’ थांबता थांबेनात…! काॅफी सोडून चाललंय सर्व काही

नांदेड : पोलीसनामा आॅनलाइन (माधव मेकेवाड) –  शहरात कॉफी शॉपच्या नावाखाली महाविद्यालयीन तरुण-तरुणींना अश्लीलतेसाठी वाव देणाऱ्या सात कॉफी शॉपवर पोलिसांनी धाडी मारल्या. यावेळी अनेक जोडप्यांना ताब्यात घेण्यात आले. प्रशिक्षणार्थी पोलिस उपाधीक्षक डॉ.अश्विनी शेंडगे यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे कॉफी शॉप चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. मंद प्रकाशात जोडप्याचा थांबा असेलेल्या काॅफी शाॅपवर अश्लील चाळे करताना अनेक तरुण तरुणी आढळल्या.

दरम्यान, पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कॉफी शॉपवर कारवाईचे आदेश दिले होते.  त्यानंतर प्रशिक्षणार्थी पोलिस उपाधीक्षक डॉ.अश्विनी शेंडगे यांनी विशेष पथकासह भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सात कॅफे शॉपीवर धाडी मारल्या. त्यात कँडी क्रश, ड्रीम लँड, स्वीट लँड, रोमांसा, स्वीट ट्रीट, कृश, फ्रेंडस् कॉर्नर तसेच नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील लव्ह बर्डस या कॉफी शॉपवर धाडी मारल्या. या कॅफेमध्ये अंतर्गत स्वतंत्र छोटे कप्पे तयार करुन मंद प्रकाशात फक्त जोडप्यांना प्रवेश दिला जात होता.

पंतप्रधान पीकविमा योजनेत राफेलपेक्षाही मोठा घोटाळा : पी. साईनाथ

या ठिकाणी असभ्य वर्तन सुरु असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार या कॉफी शॉपच्या चालकाविरोधात कारवाई करण्यात आली. या कॉफी शॉपचे परवाने निलंबित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही डॉ. शेंडगे यांनी सांगितले.

शहरात महाविद्यालय परिसर तसेच शहरानजीक असलेल्या ग्रामपंचायत भागात अनेक कॉफी शॉप उघडण्यात आले आहेत. या कॉफी शॉपमध्ये खुलेआम महाविद्यालयीन तरुण-तरुणी अश्लील चाळे करीत असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पावडेवाडी भागातील पंधरा कॉफी शॉपचे परवाने निलंबित करण्यात आले होते. नांदेड ग्रामीण पोलिसांनी कौठा भागात कारवाई केली होती. विमानतळ पोलिसांनीही दोन कॉफी शॉपवर कारवाई केली होती. यावेळीही अनेक जोडप्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर कॉफी शॉपमध्ये सुरु असलेला हा गंभीर प्रकार चव्हाट्यावर आला होता.

दरम्यान, शहरात अद्यापही अनेक भागात कॉफी शॉपमध्ये अश्लील प्रकार सुरुच असून पोलिसांना कारवाईत सातत्य ठेवण्याची गरज आहे. हा प्रकार कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रशासन अपयशी ठरत आहे का? अशी देखील चर्चा होत आहे.

जाहिरात